लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १४ जून : सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि रुग्णसुरक्षेचा उच्चांक गाठण्यासाठी केंद्र सरकारच्या “कायकल्प” योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ आरोग्य संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये गेल्या काही वर्षांत या योजनेच्या माध्यमातून मूलभूत सुधारणा घडवून आणण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे.
“कायकल्प” ही केंद्र सरकारची अभिनव योजना असून, सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, संक्रमण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, रुग्णसुरक्षा आणि परिसराचे सुशोभीकरण यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही राबवली जाते. योजनेअंतर्गत प्रत्येक संस्थेचे नियमित मूल्यांकन करण्यात येते व उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. परिणामी आरोग्य सेवांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण झाली असून, ग्रामीण भागातील रुग्णांनाही दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली असून, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, ऑपरेशन थिएटरमधील निर्जंतुकीकरण, रुग्णांची सुरक्षितता आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे रुग्णांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढला असून, सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनली आहे.
यंदाच्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून, प्रोत्साहनपर पुरस्कार अनुक्रमे आरेवाडा, मालेवाडा, कूरुड, आलापल्ली व जीमेलगट्टा या प्रा.आ. केंद्रांना प्राप्त झाले आहेत. तसेच उपकेंद्र वाकडी, विसोरा आणि घाटी यांनाही योजनेअंतर्गत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या गौरवप्राप्त संस्थांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या टीमचा जिल्हास्तरावरून गौरव करण्यात आला आहे. देलनवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सुपारे, मालेवाडा येथील डॉ. प्रमोद उंदीरवाडे, आरेवाडाचे डॉ. सतीश तिरणकर, आलापल्ली येथील डॉ. उईके मॅडम, जीमेलगट्टाचे डॉ. किरण वानखेडे व डॉ. दुर्गा जराते, तसेच उपकेंद्र वाकडी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती कांबळी यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
“कायकल्प योजना ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, ती सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या एकंदर रूपात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणारी चळवळ आहे. तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, प्रशासन व स्थानिक नागरिकांचे योगदान अमूल्य आहे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी देखील योजना अंमलबजावणीसंबंधी समाधान व्यक्त करत सांगितले की, “भविष्यातही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि स्वच्छ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘कायकल्प’ची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू राहील.”
जिल्ह्यात कायकल्प योजनेचे समन्वयक डॉ. अनुपम महेशगौरी व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके यांनी ही योजना यशस्वीपणे अंमलात आणली. त्यांच्याही कार्याची प्रशंसा करत जिल्हा प्रशासनाने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.