ग्रामसभेच्या निर्णयानुसार २००५ पासून लोहारा दारूविक्रीमुक्त

मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचे यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 30 ऑगस्ट –  मुलचेरा तालुक्यातील लोहारा हे एक छोटेसे गाव आहे. या गावातील नागरिकांच्या एकीमुळेच अवैध दारूविक्री गावात पूर्णपणे बंद आहे. ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. अशातच गावातील युवा पिढी व्यसनमुक्त घडावी व इतर गावांना प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतू ठेवून गावाच्या प्रवेशद्वारावर विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. या गावात २००५ पासून ग्रामसभेच्या निर्णयानुसार दारूविक्री होत नाही.

लोहारा गावाची लोकसंख्या १८० आहे.  ग्रामस्थांच्या पुढाकारातून दारूविक्री बंदी कायम आहे. दारूबंदी कायम टिकून राहावी, गावातील पुढील पिढी निर्व्यसनी तयार व्हावी, गावात होणारे सण, उत्सव आनंदाने साजरे करावे, गावात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये, गुण्यागोविंदाने जगता यावे, शेजारील गावात सुद्धा दारूविक्री बंदी व्हावी या विविध हेतूने दारूबंदीचा विजयोस्तव साजरा करीत विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. सोबतच दारूविक्री बंदीप्रमाणेच खर्रा विक्री बंदी करून आपल्या मुलाचे आरोग्य सुधारावे व एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची वाटचाल सुरु आहे.