सिंदखेडराजाच्या विकासाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित

राज्य सरकारच्या कारभारावर वडेट्टीवार यांची तीव्र शब्दात नाराजी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

बुलढाणा, 13 ऑगस्ट – राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सरकारला आदर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम सुरू नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्ण झाले नाही. यावरून महायुती सरकारला बहुजनांच्या प्रतिकांबद्दल आस्था नाही हे आता स्पष्ट आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांची देखील या सरकारला काळजी नाही. यंदाचा स्वातंत्र्य दिन हा शालेय विद्यार्थ्यांचा गणवेशाशिवाय होणार आहे. शाळा जून महिन्यात सुरू होऊन ऑगस्ट महिना उजाडला तरी अजून गणवेश मिळालेला नाही.टक्केवारीसाठी आणलेली महायुतीची गणवेश योजना देखील फसली आहे. अशी प्रतिक्रीया देत राज्य सरकारच्या कारभारावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुलढाणा येथे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भ्रष्टाचार शिगेला गेला आहे. बुलढाणामध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली
पैसे घेऊन मोठे फार्म हाऊस बांधले जातात त्यासाठी दुसऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातात यासारखे दुर्देव नाही. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना आणली. नंतर बहिणींची मत विकत घेतल्याच्या अविर्भावात महायुतीचे नेते वावरत आहेत. त्यांचाबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात आहे. हेच या सरकारचे खरे रूप आहे. सत्ताधारी आमदार बहिणींचा अपमान करत आहे. सरकार माफी मागत नाही. त्यामुळे या सरकारला जनता धडा शिकवेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.