क्षुल्लक वादातून मुलाकडून वडिलांचा कुऱ्हाडीने खून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १२ : किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यात घडली असून, स्वतःच्या वडिलांचाच कुऱ्हाडीने निर्घृण खून करणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

देवाजी आडकू धकाते (वय ६५, रा. ताडूरवारनगर, आरमोरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, योगेश देवाजी धकाते (वय २५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरमोरी-पालोरा मार्गावरील सुनसान ठिकाणी ही थरारक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवाजी धकाते हे पालोरा परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय करत होते. त्यांना पाच मुली व एक मुलगा असून सर्व मुलींचे विवाह झाले आहेत. वर्षभरापूर्वी योगेशचेही लग्न झाले होते आणि तो पत्नी व आई-वडिलांसोबतच राहत होता. पिता-पुत्र रोज वीटभट्टीवर एकत्र काम करत असत.

दरम्यान, देवाजी हे सुनेला रागावणे तसेच गर्भवती अवस्थेतही काम करण्यास भाग पाडणे यावरून योगेश नाराज होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. मनात साचलेला राग अखेर हिंसक वळणावर गेला आणि योगेशने वडिलांना संपविण्याचा कट रचला.

रविवारी संध्याकाळी योगेशने आधीच घराकडे जाण्याचा बहाणा करत पालोरा मार्गावरील एका एकांत ठिकाणी दबा धरला. दरम्यान, देवाजी आपल्या मुलीशी फोनवर बोलत त्या मार्गाने येत होते. योग्य संधी साधत योगेशने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात देवाजींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या किंकाळ्या फोनवर ऐकून मुलीला संशय आला आणि तिने तात्काळ शेजाऱ्यांना कळविले.

खून केल्यानंतर योगेशने रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि काहीच घडले नसल्याचा आव आणत घर गाठले. त्यानंतर तो इतरांसोबत वडिलांचा शोध घेण्याच्या नाटकातही सहभागी झाला. अखेर बोगद्याजवळ देवाजींचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

प्रारंभी वाघाच्या हल्ल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. योगेशच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या घटनेमुळे कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून, क्षुल्लक कारणांवरून घडणाऱ्या अशा घटना समाजासाठी धोक्याची घंटा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Armori muderarmori policeChild killed her father
Comments (0)
Add Comment