लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या प्राधिकृत आदेशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी श्री राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी 12.30 वाजता ही सोडत पार पडली.
ग्रामविकास विभागाच्या अधिसूचना दिनांक 9 सप्टेंबर 2025 नुसार अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रांतील पंचायत समित्यांसाठी आरक्षण ब्रह्मानुक्रमाने निश्चित करण्यात आले. या सोडतीला पंचायत समित्यांचे अधिकारी, जनप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित क्षेत्रातील सात पंचायत समित्यांपैकी कोरची, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या समित्यांसाठी अनुसूचित जमाती (महिला) आरक्षण निश्चित झाले, तर धानोरा, एटापल्ली आणि आणखी एका समितीसाठी अनुसूचित जमाती हे आरक्षण ठरले. या निकालामुळे आदिवासी समाजातील महिलांना स्थानिक स्वराज्य व्यवस्थेत नेतृत्वाची नवी संधी प्राप्त झाली असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा टप्पा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, बिगर अनुसूचित क्षेत्रातील पाच पंचायत समित्यांपैकी गडचिरोलीसाठी ना.मा.प्र. (महिला), चामोर्शीसाठी अनुसूचित जमाती (महिला), मुलचेरासाठी अनुसूचित जाती (महिला), तर देसाईगंज आणि आरमोरी या दोन्ही समित्यांसाठी ना.मा.प्र. असे आरक्षण ठरविण्यात आले आहे.
या आरक्षण प्रक्रियेनंतर आता सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती पदांच्या निवडणुकीची तयारी सुरू होणार असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत. समाजघटकांचे प्रतिनिधित्व आणि प्रादेशिक संतुलन या दोन्हींचा योग्य समतोल राखत महिलांना व अनुसूचित घटकांना नेतृत्वात संधी देणारी ही रचना स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा उत्साह देणारी ठरेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.