कृषी निविष्ठांवरील नियंत्रणासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन..

गडचिरोलीत बोगस बियाणे व खतांच्या विक्रीवर नियंत्रण; शेतकऱ्यांसाठी तातडीचा प्रतिसाद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २१ : खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशके वेळेवर व योग्य दराने मिळावीत, तसेच अयोग्य व बोगस निविष्ठांच्या वापरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या कृषी विभागातर्फे विशेष ‘कृषी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.

हा नियंत्रण कक्ष खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट २०२५ आणि रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कार्यरत राहणार आहे.

या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेतकरी व विक्रेते खालील माध्यमांद्वारे तक्रारी नोंदवू शकतातः

भ्रमणध्वनी क्रमांक: ८२७५५६९०१६९

टोल फ्री क्रमांक: १८००२३३४०००

ई-मेल: dsaogad15@gmail.com / adozpgad@gmail.com

१३ भरारी पथकांची स्थापना – बोगस विक्रीवर टाच..

जिल्ह्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्धार कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर प्रत्येकी एक असे एकूण १३ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

कोणताही वितरक किंवा कंपनी बोगस अथवा परवाना नसलेली उत्पादने विकत असल्याचे आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विकास अधिकारी कु. किरण खोमणे यांनी दिला.

‘लिकिंग’ व अन्यायकारक दरवाढीवर लक्ष केंद्रीत…

काही ठिकाणी युरिया खत विकताना जबरदस्तीने अन्य खते विकण्याचा प्रकार (लिकिंग) आणि युरिया वर अनधिकृत दरवाढ केल्याचे निदर्शनास आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, यंत्रणा सज्ज आहे.

शेतकऱ्यांचे संरक्षण हे प्राथमिक उद्दिष्ट – कृषी विभाग…

शेतकऱ्यांच्या पैशांचे, पिकांचे आणि उत्पादनाच्या क्षमतेचे संरक्षण करणे हे या नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची शंका, अडचण किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Agriculture firtilizerControl roomFartilizer Balck marketGadchiroli adminstration