जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांची उस्फूर्त गर्दी

प्रयोगशीलतेतून वैज्ञानिक जिज्ञासेचे दर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात विज्ञानाशिवाय विकासाचा कोणताही मार्ग उरलेला नाही. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून नवनवीन प्रयोग, संशोधन आणि नवकल्पनांकडे वळले, तरच देश प्रगतीपथावर जाऊ शकतो—या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या वांगेपल्ली येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला जिल्हाभरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल, तर्कशक्ती आणि नवविचारांची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे; प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर; तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विज्ञान शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष प्रयोगशीलतेतून साकार होत असल्याचे स्पष्ट झाले.

बाल वैज्ञानिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ…

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृतींचे (मॉडेल्स) शिक्षक, तज्ज्ञ आणि पालकांनी बारकाईने निरीक्षण केले. जिल्ह्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या शेकडो ‘बाल वैज्ञानिकांनी’ पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेती, तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांवर आधारित कल्पक आणि उपयुक्त मॉडेल्स सादर करून आपली प्रतिभा सिद्ध केली.

विकसित भारतासाठी ‘STEM’चा मंत्र…

या विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख सूत्र ‘STEM’—विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics)—असे असून, विकसित भारताच्या निर्मितीसाठी हे चार स्तंभ किती महत्त्वाचे आहेत, याचे प्रभावी दर्शन विद्यार्थ्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून घडवले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारांची जडणघडण करणे, नव्या स्टार्टअप्स आणि डिजिटल क्रांतीला चालना देणे, उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये विकसित करणे, तसेच गणिताच्या साहाय्याने अचूकता व विश्लेषण क्षमता वाढवणे—या उद्दिष्टांची पूर्तता या प्रदर्शनातून होत असल्याचे दिसून आले.

गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या सुरू असून, विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शैक्षणिक वातावरण अधिक सशक्त आणि प्रेरणादायी बनले आहे.

Comments (0)
Add Comment