लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,११ : मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली (माल) येथे – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग तपासणी मोहिमेचा यशस्वी आरंभ केला. दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, अडपल्ली (माल) येथे आयोजित शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ९० नागरिकांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांचा समावेश होता.
या मोहिमेचे आयोजन जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश कुमार सोलंकी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत, डॉ. स्मिता साळवे, ग्रामीण रुग्णालय मुलचेरा वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण वानखेडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. काजल बिस्वास यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र अडपल्ली (माल) येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे शिबिराचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे पार पडले.
शिबिरादरम्यान तपासणीचा तपशील असा होता…
- मुख कर्करोग तपासणी: ८३; संशयित रुग्ण – शून्य
- स्तनाचा कर्करोग तपासणी: ४५; संशयित रुग्ण – शून्य
- गर्भाशय मुख कर्करोग तपासणी: VIA – ४५ (सर्व निगेटिव्ह), Pap Smear – २०
शिबिरात सहभागी नागरिकांना तज्ज्ञांनी संपूर्ण समुपदेशन दिले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली गेली, तसेच कर्करोगाच्या लक्षणांवर लक्ष ठेवून त्वरित उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तपासणीसाठी तज्ज्ञ उपस्थित होते…
मुख कर्करोग: दंत शल्य चिकित्सक डॉ. आशुतोष जावडेकर,स्तन व गर्भाशय मुख कर्करोग: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती दारमवार उपस्थित तर VIA व Pap Smear तपासणी करिश्मा पेरामवार आणि रुग्ण समुपदेशन: प्रफुल पाल (NCD समुपदेशक) होते.या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी आवश्यक आरोग्य सेवा प्रत्यक्षात मिळाली. प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे आरोग्य जागृतीला चालना मिळाली असून, नागरिकांना आरोग्याविषयी संवेदनशील करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरला.
शिबिराच्या यशासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, अडपल्ली (माल) येथील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अभिनंदनाचे पात्र ठरले आहेत.