लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुलचेरा : दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणारा प्रेरणादायी उपक्रम म्हणून नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा यांनी पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच सद्गुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी आणि चिंतामणी विज्ञान महाविद्यालय, गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सीईएटी (CEAT) कंपनी, नागपूरने तब्बल २७ विद्यार्थ्यांची निवड केली.
दुर्गम भागातील बी.एस्सी. अंतिम वर्ष व पदवीधर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात थेट संधी उपलब्ध करून देण्याचा हेतू या ड्राईव्हमागे होता. २६ सप्टेंबर २०२५ रोजी आष्टी येथे पार पडलेल्या या मोहिमेत तिन्ही महाविद्यालयांमधील एकूण ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ऑनलाईन एप्टीट्यूड टेस्टच्या कठोर प्रक्रियेनंतर २७ जणांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यांची प्रत्यक्ष मुलाखत २९ सप्टेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. एस. माटे (प्राचार्य, सद्गुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी) तर विशेष अतिथी म्हणून डॉ. ललितकुमार शनवारे (प्लेसमेंट समन्वयक, नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा) उपस्थित होते. ऑनलाईन माध्यमातून सीईएटीचे एच.आर. अधिकारी ज्ञानेश्वर बडवाईक यांनी कंपनीची माहिती, प्रगती आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींचे सविस्तर मार्गदर्शन केले.
या यशामध्ये नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथील १२ विद्यार्थ्यांची निवड विशेष लक्षणीय ठरली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. दीपक नागापुरे यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे ही रोजगारमहोत्सवाची उंच भरारी यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया सहभागी विद्यार्थी व पालकांमधून व्यक्त होत आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हने दुर्गम गडचिरोलीच्या तरुणांसाठी औद्योगिक रोजगाराची नवी दारे खुली केली असून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी हा टप्पा प्रेरणादायी ठरला आहे.