लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांमध्ये क्रीडासंस्कार रुजविण्यासाठी आणि गावपातळीवर आरोग्यवर्धक सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा पाऊल उचलले असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षात व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी भरीव अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, ग्रामपंचायती आणि विविध शासकीय संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, अंतिम मुदत ३० जुलै २०२५ अशी आहे.
काय आहे योजना?
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोलीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत ‘व्यायामशाळा विकास योजना’ व ‘क्रीडांगण विकास योजना’ अंतर्भूत आहेत.
व्यायामशाळा विकास योजनेत नव्याने व्यायामशाळा उभारणे, इनडोअर जिम साहित्य, तसेच ओपन जिम (खुल्या व्यायामशाळा) साठी आवश्यक साहित्य पुरवठा केला जातो. हे साहित्य अधिकृत पुरवठादारामार्फत उपलब्ध करून दिले जाईल.
क्रीडांगण विकास योजनेतून समपातळीकरण, २००/४०० मीटर धावपट्टीची निर्मिती, विविध खेळांची प्रमाणित मैदाने, प्रसाधनगृह, पाण्याची सुविधा, भांडारगृह, सुरक्षा भिंत किंवा कुंपण आदी सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
कोण सादर करू शकतात प्रस्ताव?..
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद व अनुदानित शाळा, महाविद्यालये, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, ग्रामपंचायती तसेच इतर शासकीय यंत्रणा पात्र आहेत. त्यांना विहीत नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा लागेल.
गावपातळीवर आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीस चालना..
या योजनांमुळे गावपातळीवर व्यायाम व क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असून, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा प्राप्त होणार आहेत. खुल्या व्यायामशाळांद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला बळ मिळेल, तर क्रीडांगणांच्या विकासामुळे विद्यार्थ्यांना खेळाच्या क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध होईल.
अर्जासाठी संपर्क :
योजनांबाबत अधिक माहिती व अर्जाचे नमुने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. इच्छुक संस्थांनी वेळ न दवडता तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
संपर्क पत्ता :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
क्रीडा व सांस्कृतिक भवन,
कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली.
कार्यालयीन वेळ : सकाळी १०.३० ते सायं. ५.४५