मतदार याद्यांतील दुबार नावांवर राज्य निवडणूक आयोगाचा ‘कडक मोर्चा’ — पारदर्शकतेसाठी तपासणीची सक्त सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई, दि. ३० : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावे ओळखून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आणि संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली अधिकृत मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. या याद्या संबंधित संस्थांच्या पातळीवर — महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती — यानुसार प्रभागनिहाय किंवा गणनिहाय विभाजित केल्या जातात. मात्र, या प्रक्रियेत मतदारांची मूळ माहिती, नाव, लिंग आणि पत्ता कायम ठेवण्यात येतो.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्यांमध्ये ज्या मतदारांच्या नावासमोर (∗∗) असे चिन्ह नमूद आहे, ती नावे संभाव्य दुबार म्हणून ओळखली जातील. संबंधित प्रशासनाने अशा प्रत्येक नावाची स्थानिक पातळीवर स्वतंत्र तपासणी करून ती नावे एकाच व्यक्तीची आहेत की भिन्न व्यक्तींची, याबाबत स्पष्टता आणावी, असा आदेश देण्यात आला आहे.

प्राथमिक तपासणीदरम्यान मतदाराचे नाव, पत्ता, लिंग आणि छायाचित्र यांमध्ये साम्य आढळल्यास, त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील किंवा गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याची लेखी माहिती विहित नमुन्यात घेतली जाईल. एकदा मतदाराने अशी पुष्टी दिल्यानंतर त्याला इतर कोणत्याही केंद्रावर मतदान करता येणार नाही.

जर संबंधित मतदाराकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि तो मतदानासाठी केंद्रावर आला, तर त्याच्याकडून ‘दुबार मतदान केले नाही आणि करणार नाही’ या आशयाचे हमीपत्र घेतल्याशिवाय मतदानाची परवानगी देण्यात येणार नाही. त्यानंतर त्याची ओळख काटेकोरपणे पडताळल्यानंतरच मतदानाची मुभा दिली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांची पारदर्शकता वाढेल, तसेच दुबार मतदानास प्रतिबंध होईल, असा विश्वास राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.

Comments (0)
Add Comment