गणेशोत्सवाची धामधूम वाढवणार राज्यस्तरीय मंडळ स्पर्धा – २०२५

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर सुरू होण्याआधीच राज्य शासनाने मंडळांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. “महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५” जाहीर झाली असून, उत्कृष्ट सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सादर करणाऱ्या मंडळांना यंदा गौरविण्यात येणार आहे.

राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून समाजजागृती, कलाविकास आणि सांस्कृतिक जतनाचे प्रभावी व्यासपीठ मानले जाते. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी राज्य शासनाने ही स्पर्धा आयोजित केली असून, जिल्हा प्रशासनाने सर्व मंडळांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे.

स्पर्धेचे वैशिष्ट्य….

कलांचा ठेवा : गायन, वादन, नृत्य, नाट्य, दशावतार, लावणी, झाडीपट्टी, चित्रकला, मूर्तिकला यांसारख्या पारंपरिक व लुप्तप्राय कलांच्या संवर्धनावर भर.

संस्कृतीचे जतन : कवी संमेलन, पुस्तक मेळा, वक्तृत्व स्पर्धा, दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन आणि स्थानिक खेळांचे प्रोत्साहन.

पर्यावरणपूरक उपक्रम : स्वच्छता मोहीम, हरित गणेशोत्सव, जलप्रदूषण व ध्वनीप्रदूषण नियंत्रण.

सामाजिक कार्य : आरोग्य शिबिरे, महिलांसाठी उपक्रम, दिव्यांग व वंचित घटकांचे सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रबोधन.

विधायक आयोजन : ‘एक गाव – एक गणपती’, प्रथमोपचार सुविधा, पाणी व्यवस्था, मंडळ कार्यकारिणीत महिलांचा ३०% सहभाग.

प्रत्येक घटकासाठी २० गुण निश्चित करण्यात आले असून, निवड समितीच्या निर्णयाला अंतिम मान्यता असेल.

पात्रता व नियम…

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत किंवा स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेच स्पर्धेस पात्र.

मागील दोन वर्षांत राज्य/जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त मंडळांना यंदा संधी नाही, जेणेकरून नव्या मंडळांना प्रोत्साहन मिळेल.

मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून ते यावर्षीच्या अनंत चतुर्दशीपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला जाईल.

जर एखाद्या मंडळाला एकापेक्षा जास्त स्तरांवर पारितोषिक मिळाले, तर केवळ सर्वोच्च स्तराचे पारितोषिकच देण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया…

इच्छुक मंडळांनी आपले अर्ज २२ ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाइन सादर करायचे आहेत. ई-मेल आयडी: mahotsav.plda@gmail.com.

अधिक माहितीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय (दि. २० ऑगस्ट २०२५) पाहावा, असे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी कळविले.