राज्यातील कार्यकर्त्यांसोबत दुहेरी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवादाचा प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते अहेरीतून शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २८ जानेवारी: अहेरी हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचे टोक आहे. अहेरी हा विधानसभा मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अहेरी येथून राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयोजन असे की, येथून हा संवाद कार्यक्रम पुढे राज्यभर जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हा संवाद कार्यक्रम विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात होणार आहे. त्यानंतर खानदेश विभागातील धुळे नंदुरबार या भागात हा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा कोकण नंतर पश्चिम महाराष्ट्र असा हा राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. बहुतांशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. पक्षसंघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधने त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यासोबतच लोकांच्या समस्या काय आहेत. असा दुहेरी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम आहे त्यामाध्यमातून पक्षबांधणी करणे व लोकांच्या समस्या जाणून  घेऊन सरकारद्वारे त्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी आज अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना दिली.

त्यासोबतच तेलंगणा सरकारने बांधलेल्या त्यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या मेडिगड्डा धरणामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही. तेलंगणाने बांधलेल्या मेडीगट्टा धरणाचा अनियमितपणाबद्दल आमच्या सरकारने चौकशी केली मात्र त्याचा निकर्ष व अंतिम अहवाल येण्यास अवधी आहे. मात्र मेडीगट्टाच्या बँक वाटरमुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतातील पिकांचे जे नुकसान झाले आहे. त्यासाठी तेलंगाना सरकारने नुकसान भरपाई पोटी ३८ कोटी देऊ केले आहे. मेडीगट्टा धरणाच्या बांधकामावेळी जे जास्त उत्खनन केले आहे. त्याबद्दल नुकसान भरपाई दंडाच्या स्वरुपात देण्यास तेलंगाना सरकारची तयारी आहे.

याबाबतीत महाराष्ट्र सरकारने अत्यंत कडक भूमिकेत तेलंगाना सरकारसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे नुकसान होऊ देणार नाही. अशी ग्वाही जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी अहेरी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.   

त्यानंतर येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.

Anil DeshmukhBhayashri AtramDharmarao Atramjayant PatilRupali ChakankarShahin Sheikh