लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन दिले. ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भेटीत रस्ते, वीजपुरवठा, वाहतूक व पर्यटनविकासाशी निगडित विविध कामांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात सिरोंचा-आलापल्ली महामार्गाचे (६० कि.मी.) काम करणाऱ्या ए.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीने गेल्या चार वर्षांत फक्त २० टक्के काम पूर्ण केले असून शासकीय अटींचे उल्लंघन केले असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या कंपनीचा करार रद्द करून उर्वरित कामासाठी नव्याने निविदा काढावी, अशी मागणी सुगरवार यांनी केली.
तसेच तेलंगणातून सिरोंचा- असरअली टॉवर लाईन मंजूर करून वीजपुरवठ्याची समस्या सोडवावी, सिरोंचा-असरअली महामार्ग क्र. ६३ च्या उर्वरित ११ कि.मी. रस्त्याचे काम हाती घ्यावे, असरअली-पातागुडम राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करावी, अशीही मागणी करण्यात आली.
असरअली येथे महसूल विभागाची रिकामी पडलेली जमीन वापरून नविन बसस्थानक उभारावे, तसेच असरअली- सोमनूर त्रिवेणी संगम पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत मंजूर १० कि.मी. रस्त्याच्या बांधकामासाठी निविदा काढावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.