छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांना प्रेरणा देईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

औरंगाबाद 16 सप्टेंबर :-  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे व सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह आ. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल व नारायण कुचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या पुर्णाकृती पुतळ्याची उंची ११ फूट असुन वजन २ टन आहे. या पुतळ्याचे मुर्तीकार नरेंद्र सोळुंके यांचा सपत्नीक सत्कार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. उपस्थितांना संबोधित करताना उद्या आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवात पदार्पण करत आहोत, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यदिन पुर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, हा विलक्षण योगायोग आहे. नुकत्याच नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजमुद्रेचा समावेश करण्यात आला, ही निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे वेरुळचे तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा पाया इथे रचला, हाही एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दोन महिन्यात आम्ही जनहिताचे ४५० निर्णय घेतले, विद्यापीठातील भरती प्रक्रिया लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. संतपीठाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या समस्या निवारण्यासाठी हे सरकार कमी पडणार नाही अशी खात्री त्यांनी दिली.

हे देखील वाचा :-

प्रसूतीसाठी नेताना वाटेतच आणखी एक मृत्यू