‘ड्रंक अँड ड्राईव्ह’, अतिक्रमण, पार्किंग समस्या आणि अपघात प्रवण ठिकाणांवर कठोर उपाययोजना सक्तीचे ;जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ३० मे : जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने स्वीकारले असून, त्या नियोजनामध्ये नागरिकांच्या सूचनांना व अनुभवांना केंद्रस्थानी ठेवले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिली आहे.जिल्हा नियोजन भवन येथे आज पार पडलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अपघात प्रवण भागांवरील उपाययोजना, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची सुधारणा, आणि वाहतूक सिग्नलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल चर्चा झाली..

बैठकीत विविध खात्यांचा समन्वय, जनतेचा सहभाग..

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पंडा होते. आ. डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था, पत्रकार, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.


‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कठोर कारवाई; सार्वजनिक सहकार्य महत्त्वाचे..

बैठकीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणांवर शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “रस्ते सुरक्षा ही एकसंध प्रशासनिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी नागरिकांनी सूचना दिल्या, तर त्याच्या आधारे स्थळ पाहणी करून उपाययोजना निश्चित केल्या जातील.”जिल्हा नियोजन विकास निधीतून अपघात प्रवण स्थळांवरील सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांमध्ये खालील बाबी होत्या..

  • वाढत्या जड वाहतुकीसाठी रिंग रोडची गरज…
  • आठवडी बाजार व शालेय वेळात मोठ्या वाहनांवर बंदी…
  • स्वतंत्र पार्किंग व्यवस्था..
  • रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवणे..
  • वनक्षेत्रात सावधानतेचे फलक, झाडांची छाटणी..
  • गतिरोधकांची उभारणी, हेल्मेट सक्ती, यू-टर्न बंदी..
  • चामोर्शी बस स्थानकाचे स्थलांतर..
  • खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती, रिव्हर्स ट्रिप गतिरोधक..
  • सिग्नल, पार्किंग आणि AI कॅमेऱ्यांच्या वापरावर भर..

आमदार डॉ. नरोटे यांनी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची, गडचिरोली ITI व आष्टी चौकात सिग्नल बसवण्याची आणि AI आधारित CCTV कॅमेरे लावण्याची गरज अधोरेखित केली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तपासणी मोहीमेची घोषणा..

जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जूनपासून ड्रंक अँड ड्राईव्ह व हेल्मेट तपासणी मोहिमा तीव्र करण्याचे जाहीर केले. खाजगी वाहनचालकांच्या तपासणीसह सीसीटीव्ही व ट्राफिक सिग्नल वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.यासोबतच अल्पवयीन मुलांना गाडी दिली तर दंडात्मक कार्यावाई करणार .सिरोंचा  महामार्गावर जड वाहनाना बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .तसेच रस्ते सुरक्षेचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांनी माहिती दिली की NH-353C आणि 130D या महामार्गांवर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असून, २५ ते ३५ वयोगटातील तरुण, संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत अपघातांना अधिक बळी पडतात.

‘ब्लॅक स्पॉट’ पाहणी पूर्ण; निधी राखीव..

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी ३१ अपघात प्रवण स्थळांची संयुक्त पाहणी पूर्ण झाल्याची माहिती दिली. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या सहभागाविना ही लढाई अशक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.जिल्हा नियोजन समितीकडून निधी राखीव ठेवण्यात आला असून, संबंधित कामे आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

आ. डॉ. मिलिंद नरोटेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडेजिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पलजिल्हाधिकारी पंडासहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधवसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे