पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ – सव्वा लाखापैकी १६ हजार विद्यार्थी उपस्थित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १४ डिसेंबर : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानंतरही लोकांच्या मनातील कारोनाबाबत भीती कमी झाली नसल्याचे आज दि. १४ डिसेंबर रोजी आढळून आले. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थी आज शाळापासून दूर राहिले. नागपूर जिल्ह्यात १ लाख २८ हजार ६८९ विद्यार्थ्यांपैकी केवळ १६ हजार १९८ विद्यार्थांनी  शाळेत हजेरी लावली. शाळेमध्ये आपल्या पाल्याला पाठविण्यासाठी केवळ २९ हजार ४०० पालकांनीच लेखी संमती दर्शविली होती.  नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये इयत्ता ९ ते १२ वीच्या  ६४६ शाळा असून त्यात १ लाख २८ हजार ६८९ विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाने यापूर्वी २६ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, शाळा सुरू झाल्या नाही. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी जिल्हाधिका-यांनी आढावा घेऊन १४ डिसेंबरला शाळा उघडण्याचे जाहीर केले होते. तेव्हाही कोरोना चाचणी करण्याचे शिक्षकांना सांगितले. त्यावेळी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर ९ डिसेंबरला पुन्हा शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाNयांना कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५३ शिक्षक बाधित आढळले. शिक्षण विभागाने सर्व तयारी करून शाळा सुरू केल्यानंतरही कोरोनाच्या धास्तीने पालकांनी शाळेत पाठविले नसल्याचे स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले होते. याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाNयांचे तापमान मोजण्यासाठी दिलेल्या थर्मल गण तापमान मोजल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. शिवाय हातावर सॅनिटायझर देण्यात आले होते.