लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठा जपून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूल येथून विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून दिंडीला प्रारंभ करताना ते बोलत होते.
यावेळी समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त सचिन मडावी, जि.प. शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकुंद मशाखेत्री तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सीईओ गाडे पुढे म्हणाले की, जगातील अनेक वैज्ञानिकांनी विद्यार्थी अवस्थेतच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला. आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक वृत्ती रुजणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतींच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी विज्ञाननिष्ठ नागरिक घडणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत गडचिरोली–चंद्रपूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १७ व १८ नोव्हेंबर रोजी ‘डॉ. कमल रणदिवे विज्ञाननगरी’, नवेगाव येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या नवकल्पना सादर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विज्ञान दिंडीत विविध शाळांनी विज्ञानविषयक झाक्या, प्रतिकृती आणि सादरीकरणे सादर केली. विद्याभारती कन्या हायस्कूलने विज्ञान पालखी आणि डॉ. विक्रम साराभाईंची वेशभूषा सादर केली. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने ओझोन थराचा क्षय आणि त्यावरील उपाययोजनांवर आधारित झांकी मांडली. भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच राणी दुर्गावती कन्या महाविद्यालयाने वैज्ञानिक प्रतिकृती आणि स्वच्छतेवरील पथनाट्य सादर केले.
दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विज्ञान रॅलीत शहरातील विविध शाळांमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. अनेक शाळांनी विज्ञान मॉडेल्स, झाक्या आणि प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक वेशभूषा परिधान केली होती. शाळांच्या बँड पथकांसह विज्ञानविषयक घोषणा देत रॅली पुढे सरकली. नागरिकांनी घराबाहेर येऊन रॅलीचे स्वागत केले.