वाशीमच्या पोहरादेवी येथे नगारा भवनाच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

वाशीम: बंजारा समाजातील सांस्कृतिक धरोहर व कार्य, रूढी परंपरा यांची येणाऱ्या पिढीला माहिती मिळावी कोट्यावधी रूपये खर्चुन नगारा वाद्य आकाराची प्रतिकृती वाशीम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे उभारण्यात आली. या वास्तूचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येणाऱ्या २६ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते या वास्तूचे लोकार्पण होणार असल्याने याची पोहरादेवी परिसरात जय्यत तयारी सुरू आहे.
तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नगारा या वाद्याची प्रतिकृती असलेल्या वास्तू संग्रहालयाचे डिसेंबर २०१८ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या हस्ते नगारा या वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाच होता.

३७६ कोटी रुपये खर्चुन पाच मजली इमारत, १२ विविध प्रकारच्या गॅलरी मधून बंजारा समाजाची संस्कृती परंपराचे व अद्भूत दर्शन यामाध्यमातुन होणार आहे. या वास्तू संग्रहालयाच्या परिसरात संत सेवालाल महाराज यांचा पंचधातू जडीत अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. ४५ बाय ३० आकाराचा दीडशे फूट उंचीचा पांढराशुभ्र असा सेवाध्वज उभारण्यात आलेला आहे.

२६ सप्टेंबरच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड तसेच बंजारा समाजाच्या साधू संत महंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Comments (0)
Add Comment