कुरखेडा, दि. १२ फेब्रुवारी: सततच्या नापिकीला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील जामटोला येथे उघडकीस आली. राजेंद्र कलीराम होळी वय 37 वर्षे राहणार जामटोला रामगड असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक राजेंद्र होळी आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पत्नीला आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवायला सांगून प्रातःविधीसाठी लोटा घेऊन शेतशिवारात निघून गेला मात्र थोड्या वेळातच शेत शिवारातील एका चिंचेच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकून असल्याचे तेथून शेतात जाणाऱ्यांना दिसून आले. राजेंद्र होळी यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे कर्ज होते त्यातच यावर्षी नापिकी मुळे त्यातच बारा वर्षाच्या आजारी मुलाचे उपचारामुळे त्रस्त असल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा येथे पाठविले. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.