आठवडयाला महाराष्ट्राला ५० लाख लसींचा पुरवठा करा – राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १८ एप्रिल: सध्या राज्यात गरजेईतका ऑक्सिजन पुरत असून बाहेरच्या राज्यातून देखील महाराष्ट्रात ऑक्सिजन येत आहे.मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने रेल्वेने रो-रो पद्धतीने ऑक्सिजन आणण्याची मागणी करणार असून रेल्वे कडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रेल्वे या प्रस्तावावर नक्की विचार करेल असंही ते यावेळी म्हणाले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा येणाऱ्या चार ते पाच दिवसांत वाढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.राज्यातील सात रेमडेसिवीर उत्पादकांकडून उत्पादन सुरु झाल्यानंतर हा कोटा ७० ते ८० हजार पर्यंत कोटा वाढेल असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल टाकून रेमडेसिवीरच्या वाटपाकडे लक्ष द्यावं तसेच गरज असलेल्या रुग्णांनाच द्यावे अशी सूचना देखील त्यांनी केलीय.राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी आपापल्या अधिकार कक्षात निर्बंध कडक करून गर्दी थोपवावी असंही टोपे यांनी म्हटलं.राज्यात तीन ते साडेतीन लाख लसीकरण दररोज होत असून राज्यात पुर्णक्षमतेने लसीकरण करण्यासाठी दररोज आठ लाख आणि आठवडयाला ५० लाख लसींची गरज असून केंद्राने महाराष्ट्राला आठवडयाला ५० लाख लसींचा पुरवठा करावा अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महाराजा अग्रसेन भवनात आणखी २५० कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सपोर्टेड बेडची व्यवस्था – आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून जागेची पाहणी

जालन्यात दररोजच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने आणखी २५० रुग्णांसाठी ऑक्सिजन सपोर्टेड बेडची व्यवस्था केली आहे. उद्यापासूनच या ठिकाणी नवीन रुग्णांना दाखल केले जाणार असून सध्या १६० रुग्णांसाठी व्यवस्था पूर्ण झालीय.तर गरजेनुसार आणखी बेड वाढवता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.टोपे यांनी आज महाराजा अग्रसेन भवनात येऊन जागेची तसेच बेडची पाहणी केली. या ठिकाणी लागणारे डॉक्टर,कर्मचारी यांच्या भरतीसाठीचे आदेश देण्यात आले असून उद्यापासून या जागेवर रुग्णांना उपचार सुरु होतील अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.

Health Minister Rajesh Tope