“सुया घे… पण डॉक्टर व्हा!” – भटक्या वैदू समाजातून उगवलेली शुभांगी लोखंडे यांची प्रेरणादायी यशोगाथा

गावागावांत सुया, डबे विकणाऱ्या समाजातील मुलगी झाली डॉक्टर – समाज परिवर्तनाची नवी पहाट!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ओमप्रकाश चुनारकर, शिर्डी, (अहमदनगर):  “सुया घ्या… पोत घ्या… डबे घ्या… चाळणी घ्या…” – हे आवाज आपल्याला गावोगावी ऐकू येतात. पण या आवाजामागे एक शतकांपासून चालत आलेली वेदना दडलेली असते – भटक्या वैदू समाजाची पारंपरिक ओळख. शिक्षण, आरोग्य, आत्मसन्मानापासून वंचित या समाजात आज एक इतिहास घडला आहे. याच समाजातून पहिल्यांदाच एक मुलगी डॉक्टर बनली आहे – ती म्हणजे शुभांगी लक्ष्मण लोखंडे.

परंपरेच्या बेड्या तोडून शिक्षणाच्या प्रकाशाकडे झेप

राहाता तालुक्यातील लोणी गावातील शुभांगीचा प्रवास एखाद्या चित्रपटात शोभावा असा आहे. भटक्या समाजाच्या पारंपरिक कुंडीत जन्म घेऊनही तिने पुस्तकांचा आणि स्वप्नांचा हात सोडला नाही. घरात शिक्षणाचं फारसं वातावरण नव्हतं. पण तिच्या आजोबांनी – ताया लोखंडे यांनी – एक मोठा निर्णय घेतला, “माझी नात डॉक्टर होणार!” ही फक्त इच्छा नव्हती, ती एक क्रांती होती.

घरचं अंगण शिक्षणाचं मैदान बनलं

शालेय जीवनात शुभांगीने उत्तम कामगिरी केली. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मिळवलेले उज्वल गुण तिच्या आई-वडिलांसाठी डोळ्यात पाणी आणणारे ठरले. पारंपरिक समाजाची साखळी तोडत आई संगीता आणि वडील लक्ष्मण लोखंडे यांनी तिच्या पाठीशी उभं राहण्याचं धाडस केलं.

वडीलांचा व्यवसाय – भंगार संकलनाचा, आणि आई – गावात वस्तू विकणारी. तरीही त्यांनी शुभांगीच्या शिक्षणासाठी जीव ओवाळून टाकला. समाजात होणाऱ्या टीका, आर्थिक तंगी, सामाजिक दबाव – या सगळ्यावर मात करत त्यांनी ‘मुलगी शिकली प्रगती झाली’चं खरं रूप दाखवलं.

“डॉक्टर” ही उपाधी नव्हे, ती प्रेरणा आहे

शुभांगीने होमिओपॅथी वैद्यकीय शाखेची निवड केली आणि प्रचंड मेहनतीने आपलं शिक्षण पूर्ण केलं. आज ती वैदू समाजातून महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर म्हणून उभी आहे – आत्मविश्वासाने, अभिमानाने, आणि स्वप्नांनी सजलेली! ती केवळ डॉक्टर नाही, तर समाजसुधारक, मार्गदर्शक, आणि प्रेरणास्रोत बनली आहे.

“मी समाजासाठी आहे” – शुभांगीचा पुढचा टप्पा

शुभांगी आता थांबणार नाही. तिचं पुढचं ध्येय आहे – M.D. करून वैदू समाजाच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवणे. ती म्हणते, “आजही माझ्या समाजातील अनेक मुली शिक्षणापासून दूर आहेत. मी त्यांना दाखवणार आहे – शिक्षणाने आयुष्य कसं बदलतं.”

तिचं स्वप्न आहे – होमिओपॅथी उपचारपद्धतीचा व्यापक प्रचार, आणि समाजाच्या मनातील संकुचित दृष्टिकोन बदलणं. “मुली डॉक्टर होऊ शकतात, नेता होऊ शकतात, समाज घडवू शकतात” हे तिला दाखवायचं आहे.

शुभांगीची यशोगाथा – एक नव्या युगाची चाहूल..

शुभांगी लोखंडेची कहाणी ही एका व्यक्तीच्या यशाची नाही – ती एका संपूर्ण समाजाच्या आशेची आहे. तिच्या झुंजीतून ज्ञान, संधी, संघर्ष, आणि परिवर्तनाचं नवं पथ निर्माण होतं आहे.