लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २४ जून : विकासाच्या गप्पा, हेलिकॉप्टरचे दौर्यांचे फोटो आणि वातानुकूलित बैठका… पण प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या व्यथा तशाच राहिल्या आहेत. शेतकरी, विद्यार्थी, रस्ते, वाहतूक, आरोग्य, मनरेगा, घरकुल, रोजगार आणि पुरवठा या सर्वच क्षेत्रांत प्रश्नांचे डोंगर उभे राहिले असताना, पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याच्या भूभागात प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करायला तयार नसल्याची खंत नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर २६ जून रोजी गडचिरोलीत काँग्रेसतर्फे ‘हेलिकॉप्टर घ्या, पण गावात या, साहेब!’ या घोषवाक्यासह एक अनोखं आंदोलन होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली तीन वर्षे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, मात्र त्यांच्या उपस्थितीतून समस्या कमी होण्याऐवजी अधिक वाढल्याचे चित्र आहे. वादळवाऱ्याने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सुरजागड खदानीतील अवजड वाहनांची प्रचंड गर्दी अपघातांना आमंत्रण देत आहे. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, काही रस्ते प्रशासनानेच बंद ठेवावे लागलेत. शालेय वाहतुकीच्या बस जर्जर अवस्थेत आहेत. आणि शेतकरी, बेरोजगार, महिला, युवक, घरकुलधारक, मनरेगा कामगार — सगळ्यांनाच काही ना काही समस्यांनी घेरले आहे.
अनेक विभागांच्या देयकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, घरकुलासाठी रेती वेळेवर मिळत नाही, वीज वारंवार खंडित होते, रोजगाराच्या संधी नाहीत, तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणातही शेतकऱ्यांशी कुठलाही संवाद साधला जात नाही. या साऱ्या तक्रारी घेऊन सामान्य नागरिक जेव्हा अधिकारी वा मंत्र्यांकडे जातात, तेव्हा त्यांना ‘साहेब बैठकीत आहेत’, ‘वीसी सुरू आहे’ असे उत्तर मिळते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता थेट प्रशासनालाच आरसा दाखवण्याचा निर्धार केला आहे. जिल्ह्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी वरिष्ठांनी तालुकास्तरावर जावं, गावात यावं, प्रत्यक्ष संवाद साधावा यासाठी काँग्रेसने २६ जून रोजी दुपारी २ वाजता इंदिरा गांधी चौकात आंदोलनाची हाक दिली आहे.
‘हेलिकॉप्टर घ्या… पण जमिनीवर उतरा, आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जा’, हा काँग्रेसचा रोखठोक संदेश असून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शेतकरी, महिला, बेरोजगार, युवक व सामान्य नागरिकांना मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, दुर्गम आणि मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या जिल्ह्याचा विकास केवळ घोषणांनी शक्य नाही, तर तो होण्यासाठी लोकांमध्ये राहणं, त्यांचं ऐकणं आणि समस्या समजून घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून, आगामी काळात हे आंदोलन जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष कृती करायला भाग पाडेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.