दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

शहरवासीयांकडून रिंग रोडची तातडीची मागणी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शहरातील बी फॅशन मॉलच्या समोर गडचिरोली –चंद्रपूर रोडवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात ममता बांबोळे (४३) या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास त्या आपल्या स्कुटीने शाळेत जात असताना वाहन घसरून खाली पडल्या. त्याच वेळी बाजूने जात असलेल्या आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली त्या आल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्वरित शासकीय वाहनाने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ममता बांबोळे या शहरातील कारमेल शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गोकुळनगर–आयटीआय परिसरातील रहिवासी असलेल्या बांबोळे कुटुंबावर त्यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे. शाळेत, परिसरात आणि परिचयातील नागरिकांमध्येही या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इंदिरा गांधी चौक हा सर्वाधिक वर्दळीचा तसेच जडवाहन वाहतुकीचा मुख्य मार्ग असल्याने शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सतत धोक्याचा सामना करावा लागतो. रोज सकाळ-सायंकाळी या परिसरात होणारी गर्दी आणि वाहतूक दाटीमुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते..

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील नागरिकांनी पुन्हा एकदा जड वाहनांसाठी शहराबाहेरील ‘रिंग रोड’ तातडीने उभारण्याची मागणी केली आहे. चारही दिशांनी येणारी वाहने मुख्य शहरातूनच जात असल्याने अपघातांची मालिका कधी थांबणार, याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरात अनेक शाळा, महाविद्यालये आणि बाजार परिसर असल्याने मोठ्या गाड्यांची वाहतूक बाहेरून वळविण्याची गरज अत्यंत तातडीची असल्याचे मत नागरिक आणि वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गडचिरोलीसाठी स्वतंत्र रिंग रोडची संकल्पना अनेक वर्षांपासून प्रलंबित असली तरी अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत. आजच्या अपघातानंतर ही मागणी पुन्हा जोमाने पुढे येत असून शहरवासीयांनी प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती नागरिकात केली जात आहे. रिंग रोड उभारला गेल्यास शहरातील वाहतूक दडपण कमी होऊन अशा संभाव्य अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा नागरिकांचा विश्वास आहे.

Gadchiroli accidentGadchiroli traficTeacher accident dealth
Comments (0)
Add Comment