लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
छत्तीसगड : बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर परिसरात नेन्द्रा येथे कार्यरत असलेले शिक्षक कल्लू ताती यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्दय हत्येने पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा हिंसक आणि विचारशून्य चेहरा समोर आला आहे. शाळेतून परतताना केलेले अपहरण आणि मध्यरात्री घडवलेली हत्या ही केवळ एका व्यक्तीचा जीव घेणारी घटना नाही, तर संपूर्ण समाजाच्या भविष्यावर प्रहार करणारी क्रूर कृती आहे. या अमानुष कृत्याने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला, तसेच ज्ञानाचा दिवा विझवून आदिवासी समाजाच्या प्रगतीचा मार्ग अंधारात ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षण हा आदिवासी भागासाठी विकासाचा श्वास आहे. शासनाने बंद शाळा पुन्हा सुरू करून गावोगावी ज्ञानाचा दीप पेटवला होता. पण नक्षलवाद्यांनी गेल्या काही वर्षांत एकूण ९ शिक्षकांचा बळी घेत समाजाला दाखवून दिलं की त्यांना शिक्षण, विकास आणि प्रगती याच्याशी काहीही देणंघेणं नाही. यामध्ये बीजापूर जिल्ह्यात ६ आणि सुकमा जिल्ह्यात ५ शिक्षकांच्या हत्या आधीच झालेल्या आहेत. म्हणजेच शिक्षक — जे मुलांच्या भविष्याची पायाभरणी करतात — हेच नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे प्रमुख लक्ष्य ठरत आहेत.
नक्षलवादी ज्या आदिवासी हक्कांसाठी लढ्याचा मुखवटा घालतात, त्याच आदिवासी मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा जीव घेणे हे त्यांच्या दुटप्पीपणाचे जिवंत उदाहरण आहे. बंदुकीच्या नळीने कधीही समाजाचं भविष्य घडत नाही; ते शाळेच्या फळ्यावर उमटणाऱ्या अक्षरांतूनच घडतं. पण नक्षलवाद्यांनी याच भविष्याचा गळा घोटण्याचा मार्ग स्वीकारला आहे, ही गोष्ट केवळ लाजिरवाणीच नव्हे तर मानवतेलाही काळिमा फासणारी आहे.
आज शिक्षक असुरक्षित असतील तर आदिवासी भागातील मुलांचे भविष्य धोक्यात येणार हे स्पष्ट आहे. एक शिक्षक गमावणे म्हणजे एका पिढीला अंधाराच्या दिशेने ढकलणे होय. कल्लू ताती यांच्या हत्येने नक्षलवाद्यांनी केलेली ही घोर चूक आणि त्यांच्या विचारसरणीतील पोकळपणा दोन्ही उघड झाले आहेत.
समाजाने या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करणे आवश्यक आहे. शिक्षणावर वार करून नक्षलवाद्यांनी फक्त शिक्षकांना नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या भविष्यालाच अंधारात लोटले आहे. आणि त्याचबरोबर आपल्या अस्तित्वाच्याही विनाशाला गती दिली आहे.