लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, ३० मे: “शाळेच्या वर्गात ज्ञानाचे पीक पेरणारा शिक्षक रस्त्यावर अकाली मृत्यूमुखी पडतो… आणि यंत्रणा अजूनही झोपेतच आहे!” – असाच संतापजनक प्रसंग आलापल्ली बसस्थानकावर गुरुवारी सायंकाळी घडला.
शंकर गावडे, एक समर्पित शिक्षक, बाजारात खरेदीसाठी आले होते. परंतु आलापल्लीच्या रस्त्यावर पसरलेल्या अतिक्रमण, वाहतूक अराजक आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने त्यांच्या आयुष्यावर पूर्णविराम दिला. मागून आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले आणि ते जागीच मृत्यूमुखी पडले.
आलापल्ली बसस्थानक: बाजारपेठ की मृत्यूचा सापळा?
आलापल्ली हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक केंद्र. इथून अनेक मार्ग फाटतात, त्यामुळे येथील बसस्थानक आणि परिसर दिवसेंदिवस गर्दीने फुलतो आहे. पण नियोजन? ते शून्य!
रस्त्यावरच फळविक्रेते, थांबलेली वाहनं, चिल्लर विक्रेते, अवैध प्रवासी वाहतूक करणारे जीप ट्रॅक्स – हे सगळं रस्त्याच्या छातीवर चालूच. प्रशासनाने केलेली कारवाई म्हणजे ‘नाकीपाणी’, दोन दिवसांनंतर परत तीच स्थिती.
“गावडे सर चहा पिऊन जात होते… मृत्यू त्यांच्या वाटेकडे पाहत उभा होता!” गावडे गुरुजी त्यांच्या पत्नीबरोबर खरेदीसाठी आले होते. पत्नी बाजारात गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यासोबत चहा घेत होते. नंतर, ग्रामपंचायतीकडे जात असताना मागून भरधाव ट्रकने त्यांच्या आयुष्याला पूर्णविराम दिला.एक शिक्षक रस्त्यावर चिरडून मरतो आणि सगळं प्रशासन ‘रुटीन’मध्ये व्यस्त! त्यांच्या पत्नीच्या ओरडांनी परिसर हेलावून गेला. हे दृश्य उपस्थितांच्या काळजाला चिरत गेले. एका शिक्षकाचा असा अपमानास्पद मृत्यू समाजाच्या संवेदनशून्यतेवर मोठा प्रश्न उभा करतो.
कोण आहे दोषी? केवळ ट्रकचालक? की संपूर्ण व्यवस्था?
- हा अपघात एक ‘चूक’ नाही, हा गुन्हा आहे – प्रशासनाच्या निष्क्रियतेचा गुन्हा, वाहतूक नियंत्रणाच्या अपयशाचा गुन्हा आणि अतिक्रमणाकडे डोळेझाक करण्याचा गुन्हा!
- या रस्त्यावर ना सिग्नल आहेत, ना पोलीस बंदोबस्त, ना वाहतूक नियमन. बसस्थानक परिसर कायद्या-बाहेर आहे की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
- शिक्षक गावडे यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?
- ग्रामपंचायत? पोलीस? तहसील प्रशासन? की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण?
शिक्षक गेल्यावर निदान जाग तरी या!
गावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे नातेवाईक, सहकारी शिक्षक, आणि स्थानिक नागरिक संतप्त आहेत. यंत्रणेला एकच सवाल विचारला जातोय –
आमचा सवाल, तुमचं उत्तर कुठं आहे?
▪️ आलापल्ली बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात का नाहीत?
▪️ अतिक्रमण विरोधी मोहीम एकदाच होते, त्यानंतर काय?
▪️ जीप, ट्रॅक्स, चारचाकी – रस्त्यावरच का उभ्या?
▪️ फळविक्रेते, स्टॉल्स – रस्ता अडवून व्यवसाय का?
गावडे यांचा मृत्यू व्यर्थ जाऊ द्यायचा नाही…हा अपघात नाही – हा इशारा आहे.
प्रशासन, पोलीस, ग्रामपंचायत – जर तुम्ही आताही उठून पावलं उचलली नाहीत, तर उद्या आणखी एखादा बळी तुमच्या निष्क्रियतेखाली दडपला जाईल.