लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
धर्मराजु वडलाकोंडा,
गडचिरोली : सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या धडक कारवाईत सागवान तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून ६.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तेलंगाना TS १२UB ३२६२ क्रमांकाची एक XYLO कार आणि दहा सागवान लठ्ठ्यांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे कोपेला–सोमनपल्ली जंगलातून सागवानाची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा सापळा रचण्यात आला.
पहाटे चारच्या सुमारास कार अडविण्याचा प्रयत्न होताच वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र वनकर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाहन ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी रमेश सत्यनारायण कैरोजू (रा. आझमनगर, जि. भोपालपल्ली, तेलंगाना) याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी (IFS) आणि उपविभागीय वन अधिकारी अक्षय मिना (IFS) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. सुरपाम यांच्या नेतृत्वात पार पडली.
तथापि, या कारवाई बरोबरच वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण, अवैध सागवान तस्करीची ही घटना पहिली नाही. गेल्या महिन्यातच (६ ऑगस्ट २०२५ रोजी) बोलेरो वाहनातून तस्करी करताना आरोपी रंगेहात पकडले गेले होते आणि त्यावेळी ५.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सलग दोन प्रकरणे समोर आल्यानंतर नागरिक विचारू लागले आहेत की, जंगलातील वृक्षतोड होत असताना वनकर्मचारी आणि अधिकारी नेमके काय करत होते? कारवाई वाहतुकीदरम्यानच का होते, जंगलात तोड सुरू असताना कुठे लपते ही नजर? नागरिकांच्या भाषेत सांगायचे तर “कुंपणच शेत खातंय का?” हा सवाल आता टाळता येणार नाही.
नक्षलग्रस्त आणि दाट जंगलांनी वेढलेल्या या भागात वनसंपदेची अवैध तोड सुरू राहणे केवळ कायद्याला नाही, तर स्थानिक पर्यावरणालाही गंभीर धक्का देणारे आहे. केवळ कारवाईची आकडेवारी वाढवून चालणार नाही, तर तस्करीच्या मूळ साखळीवर गदा आणण्याची वेळ आली आहे. अन्यथा, वनसंपदा वाचविण्याचे दायित्व असणारा हाच विभाग नागरिकांच्या संशयाच्या भोवऱ्यात गुरफटला जाण्याची भीती आहे..