टेम्पो चालकाचा पोलीस ठाण्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद, दि. १२ मार्च: पोलिसांनी पाच हजार रुपयांची एन्ट्री मागितल्याने टेम्पो चालकाने पोलीस ठाण्यातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी विनवणी करून या टेम्पोचालकाला खाली उतरविल्याने अनर्थ टळला.

ही घटना कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात घडली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऊसतोड कामगारांना घेऊन हा टेम्पो हिंगोलीकडे चालला होता. येरमाळा पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी त्यांना अडवले व त्याच्याकडे फाईन स्वरूपात पाच हजार रुपयांची मागणी केली. आपल्याकडे पैसे नसल्याचे तो वारंवार पोलिसांना सांगत होता. मात्र पोलीस ऐकायला तयार नव्हते. जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर वैतागलेल्या ट्रक चालकाने दोरखंड घेऊन ठाण्यातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनवणी करून त्याला खाली उतरविले. येरमाळा पोलिसांत या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाकडे रीतसर चलनाचे पैसे मागितले मात्र त्याने देण्यास नकार दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

गळफास घेण्याचा प्रयत्न करणारा वाहन चालक