काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला : निष्पाप नागरिकांचा बळी, अल्लापल्लीत वाहिली श्रद्धांजली.

स्वातंत्र्यवीर वीर बाबुराव सेडमाके चौकात नागरिकांनी मेणबत्ती प्रज्वलन करून वाहिली श्रद्धांजली; देशभरात संतापाची लाट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : काश्मीरमधील पहलगाम परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आलापल्ली येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. दहशतीच्या या घटनेने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून, नागरिक एकत्र येऊन देशविरोधी शक्तींविरुद्ध आपला रोष व्यक्त करीत आहेत.

२८ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तथापि, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विस्तृत मोहिम राबवण्यात येत आहे. मृत बांधवांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी सन्मानपूर्वक पाठवण्यात आले असून, देशभरात विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन होत आहे.

मेणबत्ती मोर्चा; मौन पाळून वाहिली श्रद्धांजली

आलापल्ली येथे स्थानिक नागरिकांनी एकत्र येत स्वातंत्रवीर वीर बाबुराव चौकात मेणबत्त्या पेटवून शांततेने श्रद्धांजली अर्पण केली. मौन पाळून शहीद नागरिकांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी “भारत माता की जय”, “दहशतवादाचा निषेध असो” अशा घोषणा देत देशप्रेम व्यक्त केले.

दहशतवादाविरोधात संतप्त घोषणा..

श्रद्धांजली सभेत नागरिकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत दहशतवादाचा निषेध केला. “पाकिस्तान मुर्दाबाद”, “दहशतवाद संपवा” अशा घोषणा देत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण देशभर या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, विविध सामाजिक संघटनांनी दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे.

आलापल्लीत एकतेचे दर्शन.

या भीषण घटनेनंतर नागरिकांमध्ये देशप्रेम आणि एकतेची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळते. विविध समाजघटक, राजकीय नेते, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. या दुखद प्रसंगात देशभरातील नागरिकांनी एकत्र येत “दहशतवादाच्या विरोधात आम्ही एक आहोत” असा ठाम संदेश दिला आहे.

सरकारकडून कठोर पावले उचलणार.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.