लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांची भूमिका अधिक सशक्त व्हावी, मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि विशेषतः युवा मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
दि. २५ जानेवारी हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या समन्वयातून जिल्हा, तालुका व मतदान केंद्र स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक विषयक जागृती अधिक व्यापक व्हावी यासाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन शाळा व महाविद्यालय स्तरावर करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये गुणवत्तेच्या आधारे पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाच्या मुख्य कार्यक्रमात गौरव व सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जाणीव निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.
मतदान प्रक्रियेमध्ये नवमतदार व युवा मतदारांचा सहभाग वाढावा, त्यांच्यात मतदानाचा हक्क व कर्तव्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या हेतूने जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि. २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे.
यंदाच्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “My India, My Vote” ही संकल्पना (थीम) भारत निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आली असून, या अनुषंगाने मतदारांना मतदानाबाबत शपथ देण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वाचे असून, निर्भय, पारदर्शक व सक्रिय मतदानातूनच सशक्त लोकशाही उभी राहते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी दिली आहे.