महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे जन्मघर स्मारक संगोपनासाठी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील जन्मघर स्मारक गेल्या २७ वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि.१२ मार्च : राज्य वैभव संगोपन योजनेतून हे स्मारक पाच वर्षासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे देखभालीसाठी दिले होते. तो करार दोन वर्षापूर्वी संपुष्टात आला. त्यामुळे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव यांचे जन्मघर स्मारक संगोपनासाठी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

यशवंतरावजी चव्हाण यांचा जन्म देवराष्ट्रे येथील या घरात १२ मार्च १९१३ रोजी झाला. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे नेते होण्याचा मान त्यांना मिळाला. राजकारण आणि समाजकारणातील नीतिमूल्ये जपणाऱ्या या नेत्याच्या जन्म घराचा प्रश्न कित्येक वर्षे रेंगाळत पडला आहे.

सिटी सर्वे नंबर ५२५ मधील जन्म घराचे ठिकाण सांस्कृतिक कार्य व क्रीडा खात्याने ८ फेब्रुवारी २००१ रोजी स्मारक म्हणून घोषित केले. त्यानंतर पुरातत्व विभागाने मोडकळीस आलेल्या जन्मभराची ६५ हजार रुपये खर्च करून तात्पुरती डागडुजी केली. मात्र याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर या घराच्या दुरुस्तीसाठी साडेदहा लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी बांधकाम करून जन्मघरास पूर्वीची अवस्था प्राप्त करून देण्यात आली. पुरातत्व खात्याने तेथे फलक लावला, त्यानंतर काहीही घडले नाही. ही वास्तू पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने येथे कोणाशीही हस्तक्षेप करता येत नाही.

राज्य शासनानेही जन्मघर स्मारक राज्य वैभव संगोपन योजनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे पाच वर्षासाठी सोपवले होते. या कराराची मुदतही आता संपली आहे. हा करार वाढवून मिळावा यासाठी प्रतिष्ठानने राज्य सरकारकडे विनंती केली आहे. मात्र यावर निर्णय झाला की नाही हे अद्याप लोकांना समजू शकलेले नाही. त्यामुळे जन्मघर स्मारक संगोपनाच्या निर्णयाची लोक प्रतीक्षा करत आहेत.