लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यात कोरोना लसीकरण अत्यल्प आहे. लसीकरण बाबतीत खेड्यापाड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमजुती आहेत. त्या गैरसमजुतींचे निराकारण करण्याकरीता येथील तहसील कार्यालयात सहविचार सभा घेण्यात आली.
यावेळी गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, राष्ट्रवादी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, शिवसेना नेते अशोक गावतुरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बन्सोड, तहसीलदार सी आर भंडारी, बीडीओ देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी, डॉ. हरिष टेकाम, तालुक्यातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, बचतगट व महिला गटाच्या पदाधिकारी, महाग्रामसभेचे पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पत्रकार यांची संयुक्त सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
कोरोना लसीकरण संदर्भात गावखेड्यात बरेच गैरसमज आहेत. लसीकरणाने लोक मृत्यू पावतात, नपुंसकता येते, गावपुजारीच कोरोना ची औषध देतात. गावखेड्यातील झोला डॉक्टर बरे करतात. सरकारी दवाखान्यात गेला की कोरोनाच झाला म्हणतात. अशाप्रकारे बरेच गैरसमजुती आहेत. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाला खुप कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही ज्या लोकांनी लसीकरण करून घेतले, त्या लोकांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण झाल्या काय? असे मुख्य कार्यकारी अधिकारी विचारताच कोरची इथून २ किमी अंतरावरील गुटेकसा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे जेष्ठ नेते आसाराम शेंडे यांनी आरोग्य विभागाची लक्तरे वेशीला टांगली.
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य विभागाची कान उघाडणी केली व यानंतर अशाप्रकारची चुक आरोग्य विभागाकडून होणार नाही याची ग्वाही दिली. व तालुका स्तरावर राजकीय पुढारी, अधिकारी व पत्रकार यांचा टास्क फोर्स तयार करून तालुक्यात येणाऱ्या अडचणी व तालुक्यातील लोकांना लसीकरण साठी प्रवृत्त करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. व लसीकरण केल्यानंतर कुणालाही ताप किंवा कोणत्याही अडचणी आल्यास त्यासाठी २४ तास संपर्कात राहण्यासाठी व पुढील उपचार करण्यासाठी काल सेंटर निर्माण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
कोरची तालुक्यात आजतागायत २८०० लसीकरण केले आहेत, पण कुणालाही कोविड हा आजार झाला नाही. व असलेल्या गैरसमजुती पैकी एकही अडचण निर्माण झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील लोकांनी तिसरी लाट येण्याआधी १०० टक्के लसीकरण करून घ्यावे असे सीईओ कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस