सेवा आणि सामाजिक परिवर्तनाचा संगम — अमृता फडणवीस यांचा भावस्पर्शी संदेश,पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान”…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे, १३ जुलै : पुण्यनगरीत दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या १२८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित “लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार” सोहळा म्हणजे एकाच वेळी अध्यात्मिक परंपरेचा गौरव, सामाजिक सेवाकार्याची पावती आणि परिवर्तनशील स्त्रीशक्तीच्या योगदानाला दिलेली मानवंदना होता. मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी “पुण्यात अध्यात्म, राष्ट्रप्रेम आणि सुधारणा यांचा सुरेख संगम आहे. ही नगरीच प्रेरणादायी आहे,” असे सांगत भावनिक भाषणातून पुण्याच्या आत्म्याला स्पर्श केला.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांचे स्वरूप होते — दत्तमहाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती, २५ हजारांची सन्मानराशी, महावस्त्र. यंदाचा हा सन्मान निराधार, परित्यक्त व अनाथ नवजातांसाठी कार्य करणाऱ्या ‘महिला सेवा मंडळ’, जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर, आणि पुरातन शिल्पांना नवजीवन देणाऱ्या वज्रलेपन कलाकार स्वाती ओतारी यांना प्रदान करण्यात आला. ‘महिला सेवा मंडळा’तर्फे संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त पुष्पा हेगडे यांनी पुरस्कार स्वीकारला आणि भावविवश होत “८४ वर्षांत हा आमचा पहिलाच पुरस्कार आहे, ही आमच्या कार्याची खरी पावती आहे,” असे म्हटले.

डॉ. जयश्री तोडकर यांनी लक्ष्मीबाईंचा उल्लेख “१२५ वर्षांपूर्वीच्या आंतरप्रेन्युअर” म्हणून करत आजच्या आरोग्यसंकटाच्या काळात भारतातील लठ्ठपणा व मधुमेहाचा वेगाने वाढता धोका अधोरेखित केला. स्वाती ओतारी यांनी “ईश्वराची सेवा मूर्तीशुद्धीच्या व्रजलेपनातून” होत असल्याचे सांगत स्त्रीशक्तीच्या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, “गणेशोत्सवाच्या सार्वजनिक साजऱ्याच्या कल्पनेमागे टिळकांसोबत लक्ष्मीबाईंचा हात होता. त्यांनी शांतपणे, संवेदनशीलतेने समाजपरिवर्तन केले. त्यांचेच प्रतिबिंब आजच्या पुरस्कारार्थींमध्ये पाहायला मिळते.”

कार्यक्रमात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त अ‍ॅड. रोहिणी पवार यांचा विशेष सन्मानही करण्यात आला. काका हलवाई फाउंडेशनचे राजेंद्र व युवराज गाडवे यांनी दत्तमंदिर ट्रस्टला ५१ हजारांची देणगी जाहीर केली.

या भव्य कार्यक्रमाला राज्य युवा धोरण समितीच्या सदस्या डॉ. निवेदिता एकबोटे, ट्रस्ट अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ, उपउत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. कदम यांनी लक्ष्मीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.

सूत्रसंचालन डॉ. प्रिया निघोजकर यांनी केले, स्वागत अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी केले, तर आभार युवराज गाडवे यांनी मानले.