बनलेला रस्ता ट्रॅक्टरने नांगरून उद्ध्वस्त, सहपालकमंत्र्यांचा संताप; वनविभागाचा अजब कारभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : ‘विकासाच्या वाटेवर खळी अडथळा ठरतोय तो वनकायद्याचा भाऊ आणि अधिकार्‍यांचा आडमुठेपणा!’ हे विधान काही केवळ राजकीय भाष्य नाही, तर वास्तव ठरतंय. आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३डी वरील तमनदाला फाटा ते अमडेली या अवघ्या एक किलोमीटरच्या मार्गावर गिट्टी टाकून तयार केलेला रस्ता वनविभागाने ‘कायद्याचे उल्लंघन’ झाल्याच्या कारणावरून ट्रॅक्टरने नांगरून उद्ध्वस्त केला.

ही कारवाई केवळ रस्त्याचे नव्हे, तर शासनाच्या प्रतिमेचेही नांगरण करणारी ठरली आहे. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी याची गंभीर दखल घेत उपवनसंरक्षक पूनम पाटे व वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

जुना रस्ता, नव्या अडचणी..

तमनदाला फाटा ते अमडेली हा जुना रस्ता असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जुलै २०२४ मध्ये प्रस्ताव पाठवला होता. मात्र, वनविभागाने ‘त्रुटी’ काढून तो प्रस्ताव प्रलंबित ठेवला. त्यामुळे स्थानिक अडचणीत आले. गिट्टी टाकून रोलरने दबाई करून मार्ग काहीसा सुसह्य करण्यात आला. पण त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रस्ता उखडून टाकला!

सहपालकमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया..

ही माहिती मिळताच सहपालकमंत्री जयस्वाल यांनी उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना थेट फोनवरुन कानउघाडणी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “रस्ता खोदण्यासाठी खर्च कोठून आला? त्याला मंजुरी कोणी दिली? स्वखर्चाने केला असल्यास वनकायद्यांतर्गत गुन्हा नोंद व्हावा.”

जयस्वाल यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस केली आहे.

रस्त्याच्या नावाखाली ‘विकास’ नांगरला!..

या प्रकरणाने गडकरींच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली. निवडणुकीपूर्वी चामोर्शीत गडकरी म्हणाले होते, “वनविभाग म्हणजे झारीतील शुक्राचार्य, विकासात खरा अडसर.” आज त्याच विधानाचा अनुभव रस्त्यांवर प्रत्यक्ष दिसतो आहे.

केवळ या रस्त्याचेच नव्हे, तर सिरोंचा-आलापल्ली मार्गाचेही काम वनविभागाच्या ‘तांत्रिक हरकतीं’मुळे थांबवण्यात आले होते. या मार्गावर खासगी बस चिखलात अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यातून प्रवाशांची अवस्था समाजमाध्यमांवर उघड झाली होती.

स्थानिकांमध्ये संतापाचा उद्रेक…

तमनदाला फाटा ते अमडेली हा महामार्ग क्रमांक एनएच १६ जुना महामार्ग असून हा झिंगानूरसह १० पेक्षा अधिक गावांना जोडणारा मार्ग आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा रस्ता उध्वस्त केल्यामुळे रहदारीच्या अडचणी वाढणार आहेत. या कृतीमुळे कंत्राटदाराचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण शासनाची विश्वासार्हता देखील डळमळीत झाली आहे.

एकूणच विचार करण्यास भाग पाडणारे चित्र..

वनसंवर्धन हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे, पण विकासकामांवर कायद्याच्या नावाखाली ट्रॅक्टर चालवणे, ही शहाणीव की हट्टाग्रही वृत्ती? या घटनेने पुन्हा एकदा वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Ashish Jaiswalbad roadForest DepartmentGadchiroli rodsPWD