अहेरीतील अमानुष अत्याचार प्रकरणी दोषीस मरेपर्यंत फाशी; साडेसात वर्षांनंतर न्यायालयाचा कठोर निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : शेजारी राहणाऱ्या महिलेवर मध्यरात्री घरात घुसून लैंगिक अत्याचार करून, कुशीत झोपलेल्या चिमुकल्याची निर्घृण हत्या व पीडित महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल साडेसात वर्षांनंतर या अमानुष गुन्ह्याचा निकाल लागत, अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. २४) हा ऐतिहासिक निर्णय दिला.

संजू विश्वनाथ सरकार (वय ३०) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १९ जून २०१७ रोजी मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर गावात हा संतापजनक प्रकार घडला होता. पीडित महिलेचा पती मजुरीसाठी आंध्र प्रदेशात गेल्याची संधी साधून आरोपीने मध्यरात्री तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या वेळी महिलेचे बाळ जागे होऊन रडू लागल्याने, आपल्या कृत्याला अडथळा ठरू नये म्हणून आरोपीने उशीने बाळाचे नाक व तोंड दाबून त्याची हत्या केली. डोळ्यांसमोर आपल्या लेकराचा जीव घेतला जात असताना असहाय मातेला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. संतप्त नागरिकांनी आरोपीचे घर पेटवून दिले होते. जीवाच्या भीतीने आरोपीचे कुटुंब गाव सोडून आष्टी येथे स्थलांतरित झाले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आरोपी जामिनावर सुटून आष्टी येथील एका गॅरेजमध्ये काम करत होता. याच काळात त्याने विवाहही केला होता.

मात्र, न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर आरोपीच्या कृत्याची गंभीरता, अमानुषता व समाजमनावर झालेला परिणाम लक्षात घेत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयामुळे पीडितेला उशिरा का होईना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजाला हादरवून टाकणाऱ्या गुन्ह्यांविरोधात न्यायव्यवस्थेने दिलेला कठोर संदेश म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे.

#aheri newsCourt oder
Comments (0)
Add Comment