देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज

पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई: मुंबईत रस्ते वाहतुकीतील कोंडी हा मोठा प्रश्न आहे या करिता देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, ही आधुनिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदरादरम्यान चालविण्यात येणार असून, जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ती प्रमुख साधन ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) व जेएनपीटी यांच्यातील करारानंतर पुढील महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

मुंबईत रस्ते वाहतुकीतील कोंडी हा मोठा प्रश्न आहे. या समस्येवर उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी काही वर्षांपूर्वी वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागडे तिकीट भाडे यामुळे सामान्य मुंबईकरांनी या सेवांना फारसा प्रतिसाद दिला नाही. या पार्श्वभूमीवर पर्यावरण स्नेही आणि प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ही संकल्पना पुढे आली. मात्र, इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सींचे उत्पादन देशात होत नसल्याने याआधी परदेशातून त्या खरेदी करण्याचा विचार करण्यात आला होता. या आव्हानावर मात करत, माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने देशातच इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची निर्मितीही यशस्वीपणे पूर्ण केली. एमडीएल तयार केल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची सेवा आता जेएनपीटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची वैशिष्ट्ये:
– लांबी: १३.२७ मीटर
– रुंदी: ३.०५ मीटर
– आसन क्षमता: २५ प्रवासी
– वेग: १४ नॉट्स
– बॅटरी: ६४ किलोवॅट (चार तास चालू शकते)
– वातानुकूलित सुविधा

मुंबईकरांना परवडणाऱ्या दरांत जलमार्गाचा आनंद घेता यावा व शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी व्हावा, यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीसाठी हा उपक्रम जलवाहतुकीच्या क्षेत्रात नवा अध्याय असणार असल्याची माहिती जेएनपीटी दिली आहे.

 

electric water taximumbai traficonther life of mumbaiइलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी