लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १९ जुलै : कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान विदर्भातल्या विविध भागांमध्ये रेमडेसिव्हिर इंजक्शनचा काळाबाजार केल्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागमी करत याचिका दाखल करणाऱ्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दणका दिला. या तरुणाने गुन्हा रद्द करावा, अशी याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ती फेटाळून लावली.
या प्रकरणात न्यायालयाने दखल घेत तपास यंत्रणांना संकट काळात औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अशा प्रकरणाची चौकशी थांबविण्याचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना नोंदविले.
यवतमाळ येथील सौरभ मोगारकर (वय २५) याने ही याचिका दाखल केली होती. त्याच्यावर १ लाख ७१ हजार रुपयांच्या रेडमेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा आरोप आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान शहर तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात रेडमेसिव्हिरचा काळाबाजार सुरू होता. कोरोनासंदर्भात न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करवून घेतली होती.
या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने रेमडेसिव्हिरच्या काळाबाजारवर तिवृ शब्दांत नाराजीही व्यक्त केली होती. तसेच त्याबाबत वेळोवेळी आदेशही दिले होते. न्यायालयाच्या आदेशांनंतरच तपास यंत्रणासुद्धा याबाबत अधिक सजग झाल्या. त्यामुळे अशा प्रकरणाची चौकशी थांबविणे आदेश न्यायालय देऊ शकत नाही, असे मत व्यक्त करीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
हे देखील वाचा :
बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश