पीएम यशस्वी योजनेंतर्गत मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : समाजातील मागास घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने राबविलेल्या प्रधानमंत्री यंग अचीव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम (PM YASASVI) योजनेअंतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या २० जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत असून, इयत्ता ९ वी व १० वी (मॅट्रिकपूर्व) तसेच मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित शाळा व महाविद्यालयांनी संस्था स्तरावर अर्ज पडताळणी करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज भरावेत, तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांनी अर्जांची पडताळणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार क्रमांक, बँक खाते तपशील आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक किंवा दस्तऐवजी त्रुटी राहू नये, यासाठी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज नोंदणी किंवा पडताळणी प्रक्रियेदरम्यान अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, गडचिरोली यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment