लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत सामाजिक न्याय दिन साजरा करताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याच्या दिशेने प्रशासनाचे प्राधान्यक्रम स्पष्ट करत, जिल्ह्यातील प्रत्येक विकास आराखड्याच्या केंद्रस्थानी विद्यार्थी असतील, असे स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठीचे मार्गदर्शन यासाठी समर्पित उपक्रम सुरू केले जातील, आणि केवळ नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातही शैक्षणिक संधींची समानता निर्माण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदावर असताना विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या मनात असलेली सामाजिक बांधिलकी त्यांच्या कृतीतूनही दिसून येते. याच संकल्पनेतून जिल्हा मुख्यालयावर २०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वातानुकूलित आधुनिक अभ्यासिका आणि ग्रंथालय उभारण्यात आले असून, याचे उद्घाटन त्यांनी स्वहस्ते केले. अभ्यासाचा शांत व योग्य पर्यावरणात पोषण व्हावे यासाठी अशा सुविधा तालुकास्तरावरही निर्माण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांची माहिती घरबसल्या पोहोचावी यासाठी ‘आपला दोस्तालू’ हा अभिनव उपक्रमही सुरू करण्यात आला असून, ९४२३११६१६८ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती सहज उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशासनाने घेतलेला हा बहुआयामी दृष्टिकोन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही अधोरेखित केला. पुणे-मुंबईसारख्या शहरांपेक्षा गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातही दर्जेदार ग्रंथालय उभारण्यात आल्याची नोंद घेत विद्यार्थ्यांसाठी इस्रो भेटीपासून ते राष्ट्रीय स्तरावरील संधी मिळवून देण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी ‘घर घर संविधान’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवनविरोधी दिन आणि नशामुक्त भारत अभियानालाही प्रारंभ देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित लाभार्थी यांच्यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.