लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ४ : विद्युत पुरवठा हा ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा कणा आहे. मात्र विद्युत वितरण विभागाच्या कामकाजावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून विभागाने कामकाजाची गती वाढवून अखंड व दर्जेदार वीजपुरवठा देत नागरिकांच्या समस्या प्राधाण्याने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. सोबतच प्रत्येक ब्रेकडाऊनचे ॲनालिसिस करून तांत्रिक उपाययोजना ठरविण्याचे तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे सांगितले.
विद्युत वितरण विभागाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल घेतला. विद्युत वितरणचे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता हितेश पारेख, जितेंद्र वाघमारे, भारतभुषण अवघड, उपकार्यकारी अभियंता सचिन कोहाड तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते.
अहेरी उपकेंद्रावर जास्त लोडचा प्रश्न
अहेरी येथील ११ केव्ही लाईनवर वाढत्या लोडमुळे वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सब-स्टेशनवरील लोड कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि लोड बॅलन्सिंगचा आराखडा तयार करण्याचे सांगितले. तसेच ११ केव्ही लाईनच्या विस्तार व सुधारणा खर्चाचा सविस्तर तांत्रिक आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले.
ऊर्जेच्या वापरात झालेली वाढ आणि भविष्यातील मागणी
२०२० च्या तुलनेत २०२५ मधील नागरिकांच्या विद्युत वापरामधील झालेली वाढ तसेच येत्या काळात एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग प्रकल्प सुरू झाल्यानंतर अतिरिक्त विद्युत मागणी कशी पूर्ण करता येईल याबाबत विद्युत विभागाने नियोजन करण्याच्या सूचना श्री पंडा यांनी दिल्या.
पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आणि सौर योजना राबविण्यावर भर
चामोर्शी तालुक्यात पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेत जास्त प्रमाणात अर्ज नामंजूर होत असल्याचे निदर्शनास आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीओ व तहसिलदार यांना किरकोळ तांत्रिक चुका तत्काळ सुधारून पात्र नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. “मागेल त्याला सौर योजना” सिरोंचा व अहेरी तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देताना, सिरोंचातील अतिक्रमणे हटवून योजनांचा मार्ग मोकळा करण्यास सांगण्यात आले.
जीआयएस मॅपिंग गती शक्ती योजनेत गती आणावी
‘गती शक्ती योजना’ अंतर्गत विद्युत विभागाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आणून देत एसडीओ व तहसिलदार यांच्या समन्वयाने माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.
देखभाल आणि लोकांच्या तक्रारींवर कार्यवाही
एमएसईबी विभागाविरुद्ध देखभाल व विलंबित तक्रारींमुळे नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांनी दर महिन्याला विद्युत अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठक घेऊन तक्रारींचे निवारण करण्याचे तसेच शासकीय कार्यालये व क्वार्टर्समध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या सूचना दिल्या.
अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी विद्युत विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीत विद्युत विभागाने पावसाळ्यात झाडे पडणे, लाईन तुटणे, तसेच वनक्षेत्रातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील मागणी लक्षात घेता, ११ केव्ही आणि ३३ केव्ही लाईनचे बळकटीकरण व विस्तारीकरण करण्याकरिता सुमारे १६६.४१ कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला विद्युत व महसूल विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.