लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओम.चुनारकर / रवि मंडावार
सिरोंचा, ३ जून – अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात फणफणणारी दुपार, नळाला न येणारे पाणी, बंद पडलेले पंखे आणि मोबाइलमधून हरवलेला संपर्क… सिरोंचातील नागरिकांनी कालचा संपूर्ण दिवस अक्षरशः हालअपेष्टांत काढला. कारण एकच – महावितरण कंपनीचा ठरलेला हलगर्जीपणा.
दुपारी बारा वाजता अचानक गायब झालेली वीज रात्री दहा वाजेपर्यंतही परतली नाही. एवढा मोठा कालावधी अंधारात आणि उन्हात काढावा लागल्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत, ‘आलापल्लीवरून गेले आहे’ अशा ठराविक उत्तरांमध्येच अडकलेले दिसले.
“वीज” नाही तर “नीती” का हरवली?
वीज ही फक्त सोयीची गोष्ट नसून लोकांच्या जीवनशैलीचा मूलभूत आधार आहे. दिवसभर तापलेल्या सिरोंचातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, गृहिणी आणि शेतकऱ्यांनी संध्याकाळ अंधारात आणि हैराणीत काढली. पंखे बंद, कुलर बंद, पाणीपुरवठाही थांबलेला… अशा काळात वीज नसणे म्हणजे शहराचा श्वासच थांबवण्यासारखे आहे.
या संपूर्ण गोंधळात अधिक त्रासदायक बाब म्हणजे – महावितरणकडून ठोस माहितीचा अभाव. फोन केल्यावर “आम्हाला माहिती नाही” हे उत्तर ऐकून नागरिकांच्या संयमाचा अंत झाला. जणू काही जबाबदारी ही शब्दशः ‘पंखा फिरवून’ टाकण्यात आली आहे.
कार्यालये ठप्प, ग्रामीण नागरिकांची फरफट..
सिरोंचातील अनेक सरकारी आणि खाजगी कार्यालयांचे व्यवहारही वीज नसल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाले. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी सरकारी कामांसाठी रांगा लावल्या, पण वीज नसल्याने बँक , कार्यालयातील संगणक, प्रिंटर बंद… आणि नागरिकांची निराशा वाढत गेली. वेळ, पैसा, श्रम आणि आशा – सगळं वाया गेलं.
“महावितरण” की “महाअकार्यक्षमता”?
ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होणे ही नवी गोष्ट राहिलेली नाही. पण ही समस्या आता केवळ तांत्रिक नाही, तर प्रशासकीय असंवेदनशीलतेचे प्रतीक झाली आहे. नियमित देखभाल, वेळीच उपाययोजना, नागरिकांना माहिती देणे – या सर्व जबाबदाऱ्या महावितरण वारंवार झटकत असल्याचे चित्र आहे.
तत्काळ चौकशी आणि उत्तरदायित्वाची मागणी..
सिरोंचातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनप्रतिनिधींनी या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर येत्या काळात जनआंदोलनाच्या इशाऱ्याही देण्यात आल्या आहेत.
“सरकार सामान्य माणसासाठी आहे, तर मग अशा गंभीर प्रश्नांवर कोण लक्ष देणार? एक दिवस पुरेसा आहे लोकशाहीवरील विश्वास ढळण्यासाठी,” अशी खोचक प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
महावितरण गप्प – नागरिक संतप्त..
आजपर्यंत महावितरणने याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. पण याचं उत्तर नागरिकांनी रस्त्यावर, सोशल मीडियावर आणि स्थानिक चर्चांमध्ये दिलं आहे – “हमें जवाब चाहिए, शांतता नाही!”