लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यास्तरीय शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित कार्यशाळेत बोलताना अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी शेतकऱ्यांनी आपल्या प्रगतीसाठी इतर यशस्वी शेतकऱ्यांच्या कार्यकथांकडून प्रेरणा घ्यावी, असा मौलिक सल्ला दिला. शेतमाल उत्पादनाबरोबरच त्यावर आधारित प्रक्रिया, ब्रँडिंग, विक्री आणि व्यवस्थापन हे सर्व पैलू आत्मसात करून शेतीसह उत्पादक कंपन्यांनी समृद्धीकडे वाटचाल करावी, असं ते म्हणाले. गडचिरोली जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन येथे ही कार्यशाळा पार पडली.
कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, झाडीपट्टी आणि कोयतूर शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक चंद्रशेखर भडांगे व बाळू मडावी, तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना आता उद्योगाचा दर्जा देण्यात आला असून विविध शासकीय परवानग्या आणि प्रक्रियांमधील त्रुटी दूर करून त्यांना ‘एक खिडकी योजना’च्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योजक मदत कक्ष’ कार्यरत झाल्याची माहिती गावंडे यांनी यावेळी दिली. त्यांनी शेतकरी कंपन्यांनी स्वतःचा व्यवसाय ‘स्टार्टअप’ म्हणून घ्यावा, तांत्रिक ज्ञानासोबतच यशस्वी अनुभव घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सखोल अभ्यास करून स्वतःच्या मार्गक्रमणात वापर करावा, असंही नमूद केलं.
कार्यशाळेच्या प्रस्तावनेत प्रीती हिरळकर यांनी कृषी विभाग व आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि शेतकरी कंपन्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन केलं. निलेश गायकवाड यांनी उद्योग केंद्राच्या योजनांवर मार्गदर्शन करताना प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घ्यावा, असं सांगितलं. बँकिंग व वित्त विषयक अडचणी स्पष्ट करताना प्रशांत धोंगळे यांनी बँकिंग प्रक्रियेतील मार्गदर्शन कसे महत्त्वाचे आहे, यावर भर दिला.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणींचा थेट अनुभव सांगताना संचालक चंद्रशेखर भडांगे व बाळू मडावी यांनी शासकीय परवानग्या, कर्ज प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापनातील समस्यांचा उल्लेख केला. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून उपायांची माहिती दिली. नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी कृषी प्रक्रिया उद्योगासाठी भाडेपट्टी करार व परवान्यांच्या बाबतीत महत्त्वाचे मुद्दे मांडले. उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी विविध योजनांची माहिती ऑनलाईन स्वरूपात दिली.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील डॉ. संदीप क-हाळे यांनी भात व मका या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण तसेच कृषी अवजार बँकबाबत मार्गदर्शन केले. एफपीओसाठी आवश्यक असलेल्या परवान्यांविषयी, उद्योग आधार, एफएसएसएआय, एपीईडीए, जीएसटी, बाजार समिती परवाना आदी बाबींची सविस्तर माहिती प्रविण सेलोकर यांनी दिली. विनोद रहांगडाले आणि महेंद्र दोनाडकर यांनी एफपीओ स्थापनेपासून सेंद्रिय शेतीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी आणि प्रमाणीकरण प्रक्रियेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विनोद रहांगडाले यांनी केलं. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात नोडल अधिकारी अर्चना कोचरे, डॉ.कापगते, सहारे,मदनकर, कांबळे, माटे आणि मुनघाटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. जिल्ह्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी आणि कृषी, उद्योग व महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने कार्यशाळेला उपस्थित होते.