आगीत घर जळालेल्या कुटुंबाला जि. प. अध्यक्षांचा दिलासा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मनोज सातवी/ पालघर, 9 नोव्हेंबर : पालघर तालुक्यातील सागावे येथे सुनीता आणि सुनील बाळाराम पाडेकर यांच्या घराला अचानक आग लागून पूर्ण घराची राख रांगोळी झाली होती. सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेची संवेदनशीलपणे दखल घेत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील यांनी याबाबतची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना दिली होती. यानंतर आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जळालेल्या घराची पाहणी करून सदर कुटुंबाला रोख स्वरूपात आर्थिक मदत, तसेच धान्य आणि दिवाळी निमित्ताने फराळ देऊन मानसिक आधार दिला आहे.

सागावे येथील सुनीता आणि सुनील पाडेकर यांचे घर चार दिवसांपूर्वी आगीत भस्मसात झाले होते, ही बाब जिल्हा जिल्हा परिषद सदस्य निता पाटील यांच्या मतदारसंघात घडली असल्याने त्यांनी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या निदर्शनास आणून दिली, त्या अनुषंगाने आज दिनांक ९/११/२०२३ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भेट दिली. या वेळी कुटुंबीयांची भेट घेऊन कपडे,धान्य व आर्थिक मदत केली. तसेच लवकरात लवकर समाजकल्याण विभागामार्फत घर दुरुस्ती करण्यात येईल असा शब्द यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक समीर पाटील, सरपंच ममता गायकवाड, उपसरपंच संदेश खताले, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील,विस्तार अधिकारी विनोद पाटील उपस्थित होते.

एका आदिवासी कुटुंबियांच्या मागे उभे राहून अध्यक्ष प्रकाश निकम यांनी खऱ्या अर्थाने माणुसकी जपली असून आम्हाला त्यांच्या मुळे आधार मिळाला आहे अशा भावना यावेळी पाडेकर कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.