चंद्रपूर जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज

कोरानाविरूद्ध लढाईत जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद – जि.प.अध्यक्षा गुरनुले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळी दुरदृष्यप्रणालीद्वारे सर्व भारतवासीयांना कोरोना लसीकरणाच्या शुभेच्छा संदेश दिला. यानंतर लगेचच चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना पारिचारिका सुरेखा सुतराळे यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोज इंन्जेक्शनद्वारे दिला व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नागपूर येथील आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, आय.एम.ए. चे डॉ. अनिल माडुरवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 16 हजार 524 कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीसाठी नोंदणी करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले. आज चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्र तसेच वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा या सहा केंद्रांवर लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना यावेळी सर्वप्रथम लस देण्यात आली. पारिचारिका सुरेखा सुतराळे यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोज इंन्जेक्शनद्वारे त्यांना दिला. तसेच लस घेतल्यावरही वारंवार हात धुणे, मास्क वापरने व सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना त्यांनी सोनारकर यांना केल्या.

यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून डॉ. सोनारकर यांचे अभिनंदन केले. तर भास्कर सोनारकर यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम लस मिळत असल्याबाबत आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून इतर लाभार्थ्यांनीदेखील प्रोत्साहन घ्यावे, असे मनोगत लस घेतल्यानंतर व्यक्त केले.

Ajay GulhaneDr. Bhaskar SonarkarKishor JorgewarRahul KardileSandhyatai Gurnule