संपकाळातही सेवाभावाची ज्योत – आरोग्य कर्मचाऱ्यांकडून डेंगू व मलेरियाविरोधात जनजागृती रॅली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी (गडचिरोली): अधिकारांसाठी बेमुदत आंदोलन सुरु असतानाही आरोग्य सेवकांनी सेवा भावाची परंपरा जपली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक १९ ऑगस्टपासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेल्या कामबंद आंदोलनाच्या काळातसुद्धा, संप हा लोकांविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहे हा संदेश देत डेंगू व मलेरियासारख्या साथ रोगांविषयी जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.

दिनांक २६ ऑगस्ट रोजी अहेरी व आलापल्ली येथे आरोग्य अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले. डोक्यावर आंदोलनाचा भार आणि हृदयात मानवतेचा जिव्हाळा घेऊन त्यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व आणि डेंगू-मलेरियावरील प्राथमिक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.

सदर रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलन सुरू असूनही जनतेची काळजी घेणारा हा अनोखा उपक्रम पाहून लोकांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. जनजागृतीच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आजारांविषयीचे अज्ञान दूर होऊन योग्य पद्धतीने खबरदारी घेण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आरोग्य सेवकांच्या या उपक्रमाने आंदोलन आणि कर्तव्य यातील सूक्ष्म सीमारेषा किती संवेदनशील असतात हे दाखवून दिले. आपल्या हक्कांसाठी लढताना जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा दिलासा देणारा हा प्रयत्न ‘सेवा भावाची खरी ओळख’ ठरल्याचे समाज मनातून व्यक्त होत आहे.