गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ची शैक्षणिक भरारी

११५ आश्रम शाळांतील २४,८०७ विद्यार्थ्यांचा ‘वीर बाबुराव शेडमाके’ सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभाग....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संधी, मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ या अभिनव उपक्रमाने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांतर्गत ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा’ यशस्वीरीत्या पार पडली असून, जिल्ह्यातील ११५ शासकीय व निमशासकीय आश्रम शाळांमधील तब्बल २४,८०७ विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत सहभाग नोंदवला.

गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी दुर्गम-अतिदुर्गम भागात वास्तव्यास असल्याने, त्यांना स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान व वाचनसंस्कृतीकडे वळवणे हे मोठे आव्हान होते. हीच गरज ओळखून पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली PRAYAS – (Police Reaching Out to Youths & Students) या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेच्या सहाव्या टप्प्याची सुरुवात १२ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती. गेल्या पाच महिन्यांपासून या उपक्रमाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक आश्रम शाळेसाठी एक समन्वयक शिक्षक व संबंधित पोलीस ठाणे/उपपोस्टे/पोमकेंमधील एक समन्वयक पोलीस अधिकारी नियुक्त करून स्वतंत्र PRAYAS (सामान्य ज्ञान) व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला.

या ग्रुपच्या माध्यमातून दररोज १० सामान्य ज्ञान प्रश्न शाळांना पाठवले जात होते. आश्रम शाळांतील समन्वयक शिक्षक दैनंदिन परिपाठात विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारून, त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह समजावून सांगत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, विचारशक्ती आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित झाला.

आज दि. २२ जानेवारी २०२६ रोजी या उपक्रमाची अंतिम परीक्षा पार पडली. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील एक उल्लेखनीय बाब म्हणजे, पोमकें गर्देवाडा हद्दीतील भगवंतराव आश्रम शाळा, गर्देवाडा येथील २० विद्यार्थ्यांसह, अतिदुर्गम भामरागड उपविभागातील २,३९६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामुळे ‘दुर्गमतेवर मात करून ज्ञानाकडे वाटचाल’ हा उपक्रमाचा हेतू सार्थ ठरला आहे.

दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी. यांनी परीक्षेदरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली तसेच एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश मीडियम स्कूल, चामोर्शी येथे भेट देऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढवला.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश,अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज,तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी, आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, समन्वयक शिक्षक आणि नागरी कृती शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment