लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: चार दिवसापासून सततदार पाऊस होत असल्याने तसेच गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे संपूर्ण जिल्ह्यावर पुराचे गंभीर संकट घोंगावत आहे. सोमवारपासून सुरू झालेला विसर्ग ८,००० क्युमेक्सपासून टप्प्याटप्प्याने वाढवून मंगळवारी १२,५०० क्युमेक्सपर्यंत नेण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला असून, आधीच झालेल्या मुसळधार पावसामुळे ओसंडलेल्या नदी-नाल्यांमध्ये या विसर्गामुळे अधिकच उफाळ निर्माण झाला आहे. वैनगंगा नदी रौद्र रूपात येऊन आजूबाजूच्या गावांचा श्वास गुदमरवू लागली असून संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गासह चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरी या तालुक्यांतील एकूण १९ प्रमुख मार्ग पूर्णतः जलमय झाले आहेत. छोटे पूल, साखळीवजा रस्ते, गावपायवाटी वाहून गेल्या आहेत, त्यामुळे अनेक गावांचा जिल्हा केंद्राशी संपर्क तुटला असून काही गावं अक्षरशः टापूप्रमाणे अडकून पडली आहेत. गोगाव, पाल, वैनगंगा नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने, गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद झाला आहे. यामध्ये देसाईगंज-कुरखेडा-मालेवाडा-कोरची-भिंपूर, वैरागड-कोरेगाव-रांगी-मागदा, चांदवड-कुरखेडा-चारभट्टी-आघाडी-नैनापूर आदी मार्गांचा समावेश आहे.
पावसाचा जोर इतका जबरदस्त आहे की फक्त देसाईगंज तालुक्यात २४ तासांत १६८ मिमी पावसाची नोंद झाली असून, कोरची तालुक्यात १४५.६ मिमी इतका पाऊस कोसळला आहे. या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर शेती जलमय झाली असून, पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. वीजपुरवठा, पाणी, आरोग्य सेवा, अन्नधान्य वितरण अशा मूलभूत सेवांचा धागादोरा तुटू लागला आहे.
प्रशासनाने धोक्याचा इशारा गावागावात दिला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले असून, मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दरवाजे तीन फूट उंचीने सुरू करण्यात आले आहेत. यामुळे पूर परिस्थिती आणखी बिघडण्याचा धोका आहे.
प्रशासनाकडून ‘सतर्क रहा’ असे आवाहन केलं जात असलं, तरी या संकटाला रोखण्यासाठी पूर्वतयारी, पर्यायी रस्ते, आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही आपत्ती प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.