समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने मदत करावी

समृद्धी महामार्ग दुर्घटना मदतीवरून वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 03 जुले – समृद्धी महामार्गावरील दि. १ जुलै, २०२३ रोजी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाने केलेल्या घोषणेतील प्रत्येकी २५ लाख रूपये मदतीपैकी केवळ ७ लाख रूपये मिळाले असून उर्वरित मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला त्यावेळी त्यांनी मागणी केली.

१ जुलै, २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ रात्री दीड वाजेच्या सुमारास लक्झरी बस जळून २५ प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या दुर्घटनेला दि. १ जुलै, २०२४ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा फोल ठरली असून मृतांच्या कुटुंबीयांची सीएम फंडातून केवळ ५ लाख रूपये आणि केंद्र सरकार कडून २ लाख रूपये मदत देऊन बोळवण करण्यात आली आहे.

पुण्यातील पोर्शे कार घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत सरकारकडून तात्काळ करण्यात आली असताना ३६५ दिवस होऊनही समृद्धी महार्गावरील लक्झरी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात टाळाटाळ होत आहे. अनेकवेळा मागणी करूनही मदत न दिल्याने सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडावी यांनी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मुख्यमंत्र्याचा शब्द अंतिम असतो तो पाळण्यात यावा. तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ असा सवाल करत मृतांच्या कुटुंबियांना तातडीने उर्वरित मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

accident at samrudhi highway
Comments (0)
Add Comment