लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपूर – महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी मोठी आश्वासन दिली. आता सरकार आल्यावर मात्र सरकार बेइमानी करत आहे. लाडक्या बहिणींना अपात्र केले जाते आहे तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी वरून महायुती मधील मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त आहे. यावरून हे सरकार विश्वाससघातकी असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की या सरकारने निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती पण आता त्यांची पैसे देण्याची औकात नाही उलट या योजनेतील महिलांची संख्या सरकार कमी करत आहेत. शेतकरी कर्जमाफी वरून देखील मंत्री म्हणत आहेत, आम्ही असे आश्वासन दिले नव्हते म्हणजे मलिदा खाण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येणार पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आली की कारणे देऊन जबाबदारी झटकायचे हे योग्य नाही. सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे आता सरकारने पळ काढू नये,बेइमानी करू नये , असे वडेट्टीवार म्हणाले. सरकार एसटी,रिक्षा,टॅक्सी भाववाढ करतील..चार वर्ष लोकांकडून पैसे घेतील आणि निवडणुका आल्या की एक हजार रुपये वाटून मत घेतील हेच या सरकारचे काम आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
काल शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले यावर बोलताना काँग्रेस ज्येष्ठ नेते वडेट्टीवार म्हणाले, महाआघाडी असावी आणि आघाडी टिकावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच उद्धव ठाकरे यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यांच्या भूमिकेबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा झालेली नाही हे त्यांनी स्पष्ट केले.