टक्केकवारी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बिमार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर, 6 ऑगस्ट – गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंत लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले. गर्भवती महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोहोचली; पण प्रसूतीनंतर बाळ दगावले. या घटनेमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढले.

वडेट्टीवार म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बिमार झाली आहे. एकीकडे ‘लाडकी बहिण‘ योजनेच्या प्रचार प्रसाराकरीता २७० कोटी रुपये खर्च होत असताना अश्या घटना पुढे येत असल्याने राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कुठे मुलाला आपल्या वडिलांना घेऊन जावे लागते तर कुठे गरोदर महिलेला कावड करून रुग्णालयात न्यावे लागत आहे.एका मागून एक अशा घटना घडत आहे, पण या सरकारला आणि प्रशासनाला पाझर काही फुटत नाही.फक्त टक्केवारी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.बिमार आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील.